अमळनेर : पणन रब्बी हंगामाची भरड धान्य खरेदीस ८ जूनपासून शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. यंदा शासनाने अत्यल्प उद्दिष्ट दिल्याने हमीभाव धान्य खरेदीत वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर ज्वारी,बाजरी, मका खरेदीस प्रारंभ झाला. ज्वारीला २ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटल तर मक्याला १ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला आहे. कार्यक्रमास बाजार समितीचे प्रशासक बी.के. सूर्यवंशी, प्रा. सुरेश पाटील, नायब तहसीलदार आर.डब्ल्यू. महाडिक, शेतकी संघ प्रशासक गणेश महाजन, व्यवस्थापक संजय पाटील, भटू पाटील, भिकन पवार, सचिन पाटील हजर होते. तालुक्यात १ हजार ७६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून तालुक्याला फक्त ३ हजार क्विंटल ज्वारीचे उद्दिष्ट दिल्याने क्रमाने फक्त ८४ शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी होणार आहे.
मका खरेदी नाहीच
शासनाने मक्याला १ हजार ८५० रुपये हमी भाव जाहीर केला आहे आणि खुल्या बाजारात मका १ हजार ६३० रुपये भावाने खरेदी होत आहे. मात्र शासकीय खरेदीबाबत अद्याप कुठल्याच सूचना नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय खरेदी होईल या आशेने शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला होता. मात्र मान्सूनला सुरुवात झाल्याने पुढील वर्षाची पेरणीला सुरुवात झाल्याने शेतकरी कमी भावात आपला माल विकत आहेत.
गेल्यावर्षी राज्याला साडेतेरा लाख क्विंटल ज्वारीचे उद्दिष्ट होते. यावर्षी मात्र राज्यासाठी फक्त ७० हजार क्विंटल खरेदी उद्दिष्ट होणार आहे. यंदा प्रथमच जिल्हा व तालुकाप्रमाणे खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याला २५ हजार ५०० क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात पारोळा तालुक्याला सर्वाधिक ५ हजार क्विंटल, त्या पाठोपाठ अमळनेर ३ हजार क्विंटल उद्दिष्ट देण्यात आले आहे.
नोंदणी केलेल्या मात्र खरेदी न होऊ शकणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांना बाजारभाव व हमीभावातील फरकाचे अनुदान देण्यात यावे.
-धनंजय भदाणे, शेतकरी, दहिवद, ता. अमळनेर.
तालुक्याप्रमाणे खरेदी उद्दिष्ट क्विंटलमध्ये
अमळनेर - ३०००
चोपडा -१४००
पारोळा- ५०००
एरंडोल- २१५०
धरणगाव- २०५०
जळगाव- ११००
म्हसावद- ९००
यावल- १००
भुसावळ-१५०
रावेर- ५०
मुक्ताईनगर - २००
बोदवड - १००
जामनेर - १६५०
शेंदुर्णी - ११००
पाचोरा- १९५०
भडगाव - २२००
चाळीसगाव - २४००
एकूण - २५,५००