कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:17 AM2021-04-27T04:17:06+5:302021-04-27T04:17:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनाची चाचणी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनाची चाचणी, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी सुरू आहे. इतका वाईट प्रसंग जनतेवर आला असून, ज्या गांभीर्याने हा प्रसंग घ्यायला हवा, त्या पद्धतीने राज्य शासन गांभीर्याने घेत नाहीये, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली.
जिल्ह्यातील कोरोना उपाययोजना व इतर विषयांसंदर्भात गिरीश महाजन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची सोमवारी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली.
अहवालाला विलंब
शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाहीये. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल १२ ते १४ दिवस येत नाहीत, हे सारे चित्र गंभीर आहे.
आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात खूप मोठी आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेऊन अजूनही शासनाने उपाययोजना करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चौकशी होऊच द्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. कोरोनाच्या संकटात मदत करण्याऐवजी भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. या विषयावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विरोधकांच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही. एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकार्याने थेट गृहमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत, ही घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली आहे. न्यायालयाच्या आदेशाने सीबीआय चौकशी होत आहे. त्यामुळे सत्ताधार्यांच्या म्हणण्याला अर्थ नाही. या प्रकरणात दिलासा मिळावा म्हणून सत्ताधारी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात गेले. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. आता एकदा या प्रकरणाची चौकशी होऊन जाऊ द्यावी, भाजप काय म्हणते, याला अर्थ नाही. या प्रकरणाची चौकशी होणे अपरिहार्य आहे, असेही गिरीश महाजन म्हणाले.