आत्मपर स्वरूपाच्या कथनतंत्रातून उलगडलेल्या भावकथा ‘आबाची गोष्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:53 PM2017-11-03T15:53:06+5:302017-11-03T15:53:19+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये साहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाचा तसेच नंदुरबार येथील कवयित्री सीमा मोडक यांच्या ‘भक्तीसाधना’ या पुस्तकांचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय.
सध्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे निवासी नायब तहसीलदार असलेले आबा गोविंदा महाजन यांचे बालसाहित्य हे विविध स्वरूपी आहे. खान्देशी बोलीतील त्यांच्या प्रयोगशील कविता वैशिष्टय़पूर्ण ठरल्या आहेत. आता ‘आबाची गोष्ट’ कथासंग्रह रूपाने वाचकांच्या भेटीला येत आहे. या कथासंग्रहातील कथा नावीन्यपूर्ण आहेत. मुख्यत्वे शाळकरी मुलांच्या भावविश्वाच्या या कथा आहेत. संस्कार वा बोधकथा असे त्यांचे स्वरूप आहे. ग्रामीण, निमशहरी असे या कथांचे स्वरूप आहे. सामाजिक सहिष्णुता, समता, सत्य, सचोटी आणि चांगुलपणा या तत्त्वांचा आविष्कार करणारी दृष्टी या गोष्टींमध्ये आहे. या कथासंग्रहातील बहुतांश कथा या आत्मपर स्वरूपाच्या कथनतंत्रातून उलगडलेल्या भावकथा आहेत. लेखक : आबा गोविंदा महाजन , प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पृष्ठे : 104, मूल्य 100 रुपये. भक्तीसाधना नंदुरबार येथील शिक्षिका सीमा श्रीराम मोडक लिखित ‘भक्ती साधना’ हे विविध भजने, आरत्या व भक्तीगीतांचे पुस्तक आहे. यात साध्या, सरळ आणि ओघवत्या भाषेतील रचना आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण स्तुती, देवी स्तुती यांच्याबरोबरच कोजागरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त काकडा आरती करताना म्हटली जाणारी भजने आहेत. भूपाळीपासून दृष्ट काढण्यार्पयत भजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नंदुरबार शहराची आराध्य देवता श्री खोडाईमाता आरतीदेखील आहे. विविध भजनांमध्ये आपण आपल्या देवदेवतांचा उल्लेख करून ती भजने गाऊ शकतो, अशा रचना केलेल्या आहेत. या पुस्तकाचे नंदुरबार येथे गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा साहित्य संमेलनात प्रकाशन झाले. कवयित्री : सीमा श्रीराम मोडक, प्रकाशक : शिवम प्रकाशन, मूल्य : 30 रुपये