जळगाव : भारतीय रेल्वेने सुरुवातीपासून प्रवाशांच्या आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यापुढेही भुसावळ विभागात डीआरएम म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य आहे. या सोबतच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा व स्वच्छतेवर भर देऊन या त्रिसूत्रीची रेल्वे प्रशासनात कठोर अमंलबजावणी करणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम शंभू शरद केडिया यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. यावेळी त्यांनी वीजबिलापोटी रेल्वेलाही कोट्यवधी रुपये खर्च येतो. त्यामुळे हा खर्च वाचविण्यासाठी येत्या काळात सौर ऊर्जा आणि पवन उर्जेची केंद्रे उभारण्यात येणार असल्याचेही केडिया यांनी सांगितले.
प्रश्न : डीआरएमपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, पुढील दोन वर्षांचे आपले व्हिजन काय?
जळगाव : मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वात मोठा असून, सध्या भुसावळ विभागात रेल्वेची अनेक विकास कामे सुरू आहेत. ती कामे वेळेत आणि लवकरात लवकर प्रवाशांच्या सुविधेसाठी कशी पूर्ण होतील. या बाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या सोडवून ही विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रश्न : सुरक्षा, सुविधा व स्वच्छतेच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार आहात?
उत्तर : सुरक्षेबाबत सांगायचे म्हणजे, गाड्यांना कुठे अपघात होणार नाही, रुळावरून गाडी उतरणार नाही, आगीच्या घटना कुठे घडणार नाही, या घटनांबाबत कर्मचाऱ्यांना सतत दक्ष राहण्याच्या सूचना करणार आहोत. दुसरा मुद्दा म्हणजे स्टेशनवर ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा प्रवाशांना मिळत आहेत का नाही, याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष देण्याबाबत सूचना करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे स्वत:ची आणि कार्यालयाचींही स्वच्छता ठेवण्यासाठी आग्रह धरणार आहे. यासाठी भुसावळला आल्यापासून दोन दिवसात अनेक विभागांच्या कार्यालयात जाऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली.
प्रश्न: गेल्या आठवड्यात प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे काय निर्णय घेतला.?
उत्तर : अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आरपीएफ आणि जीआरपी मिळून प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देत आहेत. गाडीत बसल्यानंतर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत कटिबद्ध असते. त्यामुळे यापुढच्या काळातही प्रवाशांच्या सुरक्षेकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत.
प्रश्न : जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे, या कामाला वेग येण्यासाठी काय निर्णय घेणार आहात?
जळगाव : या प्रकल्पाची मी अजून माहिती घेतलेली नाही. माहिती घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. मनमाड ते इगतपुरी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, याचा डीपीआर तयार करण्याचे सुरू आहे. तसेच जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम झाले असून, चौथ्या मार्गाचेही काम सुरू झाले असल्याचे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले.
प्रश्न : सौर ऊर्जा वापरण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे, भुसावळ विभागात सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचा विचार आहे का?
उत्तर : भुसावळ विभागात सौर उर्जेच्या निर्मितीबाबत नुकतीच विद्युत विभागाची बैठक घेतली. त्यांच्याकडून सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचे काम पूर्वीपासून सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात सौर उर्जेसोबत पवन उर्जा वीजनिर्मिती केंद्रही सुरू करण्याचा विचार आहे. या विजेमुळे रेल्वेचा विजेवरील खर्चही कमी होणार आहे. कारण, कोरोनामुळे रेल्वेच्याही उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे, विजेचा खर्च कसा कमी होईल, याचा आम्ही विचार करत आहोत.