पारोळ्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 09:21 PM2020-11-23T21:21:14+5:302020-11-23T21:23:51+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आज सोमवारी जनता कर्फ्यूला सुरवात झाली. त्यास कडकडीत बंद ठेवून जोरदार प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आज सोमवारी जनता कर्फ्यूला सुरवात झाली. त्यास कडकडीत बंद ठेवून जोरदार प्रतिसाद मिळाला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दर सोमवारी जनता कर्फ्यू लागू करून बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता.
त्यानुसार सोमवारी सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मेडिकल व कृषी केंद्र वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. काही दोन चार भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने सुरु होती. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यु यशस्वी केला.
बाजारपेठेसह महामार्गावरील हॉटेल व्यावसायिक, भाजीपाला दुकानदार, छोटेमोठे व्यावसायिक यांनी ही आपली दुकाने बंद ठेवत जनता कर्फ्यूमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. नागरिकांची तुरळक हजेरी वगळता सर्वत्र शुकशुकाट मात्र दिसून आला. जनता, दुकानदार हे स्वयंस्फूर्तीने दर सोमवारी असाच कडकडीत बंद पाळणार असल्याच्या भावना बोलून दाखवली.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागला असून त्या पार्श्वभूमीवर, पारोळा येथे योग्यवेळी हे पाऊल उचलण्यात आल्याने त्याचे संपूर्ण तालुक्यातून स्वागत करण्यात येत आहे.
व्यापारीवर्गाने स्वयंस्फूर्तीने सोमवार कडकडीत बंद पाळला. आपापली दुकाने बंद ठेवून हा स्वयंस्फूर्तीचा बंद यशस्वी केला. याबद्दल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी व्यावसायिकांचे आभार मानलेत.
बाजारपेठेत सराफ दुकानदार इतर दुकानदारांनी आपआपली दुकाने बंद ठेवून कोरोनावर चर्चा करताना दिसून आली. काही व्यापाऱ्यांनी कोरोना आजाराने दुनियादारी शिकविल्याचेही मान्य केले.
बसस्टँड व रिक्षा स्टॉप, खाजगी कालिपिल्या, वाहन थांब्यावर मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात होती. बँकामध्ये बऱ्यापैकी गर्दी पाहण्यास मिळाली. सोमवार जनता कर्फ्यु असल्याची माहिती ग्रामीण भागात गेल्याने ग्रामीण भागातून लोक आले नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.