लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यात एकमेव उपाय म्हणजे जनता कर्फ्यू पालिका व पोलिस प्रशासनाने दर सोमवारी शहरात कडकडीत बंदबाबत आवाहन शहरवासियांना केले होते. या जनता कर्फ्यूला व्यापारी वर्गासह नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत कडकडीत बंद यशस्वी केला.
बाजारपेठेतील सर्व लहान मोठे दुकानदार व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांनी व महामार्ग लगत असलेली सर्व हॉटेल रेस्टॉरंट, गॅरेज दुकान, सलून दुकाने, फळविक्रेते यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला दुकाने बंद ठेवून सहकार्य केले. अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल, दूध केंद्र एवढीच दुकाने या बंदमधून वगळण्यात आली होती. मुख्य बाजारपेठ, महामार्ग वरील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई यावेळी पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे केली. दर सोमवारी अशाच प्रकारे शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कोरोनाने डोके वर काढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत होती. लोक बेफिकीर झाले होते. कुठेही मास्क वापरताना लोक दिसत नव्हती. सामाजिक अंतराचा बोजवारा उडाला होता. अशा परिस्थितीत कडकडीत बंद पाळणे, यासाठी जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे राबविणे गरजेचे होते. शहरात दर सोमवारी जनता कर्फ्यू लावणे गरजेचे होते.
-संजय यशवंत शिनकर, किराणा व्यापारी, पारोळा
शहरात कोरोनाची दुसरी लाट येत की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती, हे सर्व रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. जर कोरोनाच्या भयानक संकटातून वाचण्यासाठी सर्वांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीत जाणे टाळणे हे उत्तम पर्याय आहे.
-सुनिल वसंतराव बारी, नागरिक, पारोळा