जळगाव : वाळूचोरांविरोधात धडक कारवाई करत सोमवारी धानोरा येथे नदीपात्रातील तराफे आणि वाळू वाहतुकीसाठी तयार केलेले रस्ते नष्ट करण्यात आले आहेत. महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामुळे वाळूचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
धानोरा गावाजवळ गिरणा नदीपात्रातून तराफ्याच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू काढली जात होती. त्याची माहिती मिळताच पथकाने कारवाई करत हे तराफे पकडून नष्ट केले. अवैध गौण खनिज वाहतूक करण्यासाठी वाळूमाफियांनी तयार केलेले रस्ते नष्ट करण्यात आले. कारवाईमध्ये पथक प्रमुख किरण बाविस्कर, मनोहर बाविस्कर, वीरेंद्र पालवे, तलाठी रमेश वंजारी, पोलिस कॉन्स्टेबल चारुदत्त पाटील, हरिष शिंपी व नरेंद्र पाटील यांचा समावेश होता.
चोरटे नदीच्या पलीकडील तीरावरून आणायचे वाळू
धानोरा गावाच्या बाजूने नदीत पाणी आहे, तर नदी पात्राच्या पलीकडे खेडी काढोली बाजूने वाळूचे साठे आहेत. तेथून वाळू काढून तराफ्यांवर टाकून धानोरा येथे आणली जायची. तेथे अवैध वाळू साठे करून रात्री-अपरात्री वाहतूक केली जायची. याची माहिती मिळताच कारवाई करण्यात आली.
गेल्या आठवड्यात ६७ वाहने जप्त
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात धडक मोहीम उघडली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव शहराजवळील बांभोरी गावातून अवैध वाळू वाहतूक करणारी ६७ वाहने आणि वाळू साठे जप्त करण्यात आले होते. या वाहनांची आरटीओच्या माध्यमातून तपासणी केली जात असून, यापैकी काही वाहनांना दंडही करण्यात आला आहे.