संपकऱ्यांचे वेतन कापणार, शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश
By अमित महाबळ | Published: March 13, 2023 08:49 PM2023-03-13T20:49:29+5:302023-03-13T20:49:42+5:30
संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे.
जळगाव : संपामध्ये सहभागी होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह त्यांचे संपकाळातील वेतन कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या संदर्भातील आदेश मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, प्रांत, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठवले आहेत.
शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश त्वरित बजावण्यात यावेत, संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे.
काम नाही, वेतन नाही
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे काम नाही, वेतन नाही हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने कर्मचाऱ्यांना कळविण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
पोलिस तयारीत, बंदोबस्त पुरविणार
आम्ही विभागप्रमुखांना सांगितले आहे, की बंदोबस्त लागला तर कळवा. मात्र अद्याप अशी मागणी पोलिसांकडे आलेली नाही. तालुकास्तरावर आम्ही तयारीत आहोत. बंदोबस्त मागितला तर त्यानुसार व्यवस्था केली जाईल.
- एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक, जळगाव