नपाची जलवाहिनी खोदण्यास कठोऱ्यात विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:43+5:302021-06-05T04:13:43+5:30
चोपडा : चोपडा नगरपालिकेच्या पाणी योजनेसाठी जलवाहिनी खोदण्यास गेलेल्या पथकाला कठोरा ग्रामस्थ व महिलांनी जोरदार विरोध केला. संभाव्य विरोध ...
चोपडा : चोपडा नगरपालिकेच्या पाणी योजनेसाठी जलवाहिनी खोदण्यास गेलेल्या पथकाला कठोरा ग्रामस्थ व महिलांनी जोरदार विरोध केला. संभाव्य विरोध लक्षात घेऊन जवळपास १०० पोलिसांचा फौजफाटा येथे आणण्यात आला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शेवटी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी यातून मार्ग काढण्याबाबत ग्वाही दिली. यानंतर वातावरण शांत झाले. शुक्रवारी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.
कठोरा, ता. चोपडा गावालगतच्या तापी नदी पात्रातून चोपडा शहरास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपालिका नव्याने दुसरी जलवाहिनी आणि पंपिंग स्टेशनच्या कामाला सुरुवात करणार होते. या जलवाहिनीच्या खोदकामास कठोरा गावातील शेतकरी, ग्रामस्थ व तरुणांनी आणि विशेषकरून महिलांनी खूप जोरदार विरोध केला.
जोपर्यंत कठोरा ग्रामस्थांच्या मागण्या या लिखित स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत गावकऱ्यांचा विरोध कायम राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. कठोरा ग्रामस्थांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे आपल्या मागण्या सादर केल्या होत्या. पण त्या पत्रांवर कोणताही निर्णय झालेला नसताना तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता गावात १०० च्या वर पोलिसांचा फौजफाटा पाठविला.
गावकऱ्यांचा वाढता विरोध बघून शेवटी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी संपर्क साधून या विषयावर येत्या काही दिवसात ग्रामस्थ आणि पालिका प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याची ग्वाही दिली. त्यावर गावकऱ्यांनीही सहमती दाखवली आणि त्यानंतरच सर्व फौजफाटा परत गेला. या वेळी अशोक पाटील, पंकज पाटील, दिनेश पाटील, अरुण धनगर, गुलाब पाटील, समाधान पाटील, योगेश पाटील तसेच तरुण कार्यकर्ते दीपक पाटील, रत्नाकर पाटील, राज पाटील आणि पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विशेषकरून महिलावर्ग आणि सर्व तरुण मंडळी उपस्थित होती.