विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांनी आणली स्नेहसंमेलनात रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:11 PM2020-01-06T18:11:21+5:302020-01-06T18:11:36+5:30
गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
धरणगाव, जि.जळगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर स्वागतगीत सादर झाले. अध्यक्षस्थानी प्रा. व्ही. आर. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील, मुख्याध्यापक बी.एन.चौधरी होते. व्यासपीठावर प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावीत उपस्थित होते.
प्राचार्या रावतोळे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील संस्कृतींचे दर्शन, विविध प्रकारचे नृत्यप्रकार त्यात- लावणी, गरबा, देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक नृत्य, आधुनिक डान्स, वेस्टर्न डान्स, कॉमेडी डान्स आदी प्रकार समाविष्ट होते. कार्यक्रमाबद्दल विश्लेषण व मांडणी दीपेश चव्हाण, सनी चौटे, अथर्व तिवारी, कौस्तुभ महाजन, कल्याणी माळी, प्राजक्ता बाविस्कर, विधी गुप्ता, आर्या जैन, सानिका मराठे, दर्शन भोसले, प्रथमेश मिसर, राजश्री पाटील, अंजली कोळी, दीपश्री चौधरी या विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाला विद्यार्थी-पालक व प्रतिष्ठित उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नाजनीन शेख यांनी, तर आभार प्रदर्शन ग्रीष्मा पाटील यांनी केले.