विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी नदीतून करावा लागतो जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 08:11 PM2019-07-30T20:11:34+5:302019-07-30T20:11:40+5:30
हिवरी व हिवरखेडा गावातील स्थिती : पावसाळ्यात गावकऱ्यांना इतर गावांशी संपर्क साधणे होते कठीण
मनोज जोशी।
पहूर,ता. जामनेर : हिवरी व हिवरखेडा गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून वाघूर नदीच्या पाण्यातून जावे लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यातून बिकट वाट काढावी लागत असून याठिकाणी पुलाची मागणी पाच ते सहा वर्षांपासून असताना या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
हिवरी व हिवरखेडा जवळपास दीड ते दोन हजार लोकसंख्येचे गाव असून दोन्ही गावांच्या मधून वाघूर नदी वाहते. नदीचे पात्र मोठे असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी असते. हिवरी व हिवरखेडा गावातील लोकांना दोन्ही गावात जाण्यासाठी नदी ओलांडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याचप्रमाणे पिंपळगाव कमानी, जांभूळ, वडगाव या गावांना जाण्यासाठी हिवरखेडा- पिंपळगाव हा रस्ता सोयीस्कर असून दळणवळणाच्या साधनांबरोबर शेतात जाण्यासाठी हा रस्ता मुख्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना नदीच्या पाण्यातून बिकट वाट काढून चालावे लागत आहे. विशेष म्हणजे हा जिवघेणा खेळ काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही गावांच्या संपकार्साठी पुलाची मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्र्यांना ग्रामपंचायतकडून पत्र
हिवरखेडा दिगर व हिवरी या दोन्ही गावांच्यामध्ये फरशी पुल करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन व वाघूर लघूपाटबंधारे विभाग यांच्याकडे वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती सरंपच केशव पाटील यांनी दिलीे.