जळगाव : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे बुधवारी पालक शिक्षक सभा शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्दिष्टाने शासनामार्फत ब्रिज कोर्सचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे उजळणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. सोमवार ते शुक्रवारपर्यंत विविध विषयांवरील मार्गदर्शन शनिवारी खेळाचा तास, आठवड्यातून एक दिवस वाचन पाढे, दूरदर्शन तसेच इतर प्रसारमाध्यमांचा वापर, स्वाध्याय, चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, कृती उपक्रम अशा वर्षभर राबवल्या जाणाऱ्या शालेय सहशालेय उपक्रमांची माहिती पालक शिक्षक संघाच्या सदस्यांना मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्याकडून देण्यात आली.
पालकांशी साधला संवाद
शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी यावेळी शिक्षकांशी संवाद साधत विविध नवनवीन प्रयोग वापरून कशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सरला पाटील, सूर्यकांत पाटील, स्वाती पाटील, धनश्री फालक, दीपाली चौधरी, अशोक चौधरी, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, योगेश भालेराव, सुधीर वाणी आदी उपस्थित होते.