कपाशी वेचणाऱ्या हातात ‘नीट’ परीक्षेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:37 PM2020-10-18T17:37:21+5:302020-10-18T17:38:40+5:30
काळ्या मातीत राबणाºया या गुणवंताचे नाव आहे, संकेत बाबूलाल महाजन. तो मूळ राहणारा पोहरे येथील. त्याच्या यशाचे चाळीसगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
चाळीसगाव : कपाशी वेचताना त्याच्या डोळ्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न फुलत होते. झालेही तसेच. कपाशीची वेचणी करतानाच त्याला नॅशनल इलिजिबीटी कम इंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षेचा निकाल समजला. पहिल्याच प्रयत्नात ५९४ गुण मिळवत त्याने वैद्यकीय शिक्षणाचा दरवाजाच उघडून घेतला आहे. काळ्या मातीत राबणाºया या गुणवंताचे नाव आहे, संकेत बाबूलाल महाजन. तो मूळ राहणारा पोहरे येथील. त्याच्या यशाचे चाळीसगाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे. शेतकरी आई-वडिलांच्या डोळ्यात लेकाच्या यशाने आनंदाचे भरते आले आहे.
संकेत महाजन हा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी. बारावीच्या परीक्षेतही शेती कामात खंड न पाडता त्याने महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. आपल्याला डॉक्टर व्हायचेच. हा ध्यास त्याने मन पटलावर जणू गोंधून घेतला होता.
कोणतेही महागडे क्लासेस न लावता आणि त्यासाठी परजिल्ह्यात न जाता संकेतने चाळीसगावी राहणारे त्याचे शिक्षक असणारे काका मुकुंद सदा महाजन यांच्याकडे राहून नीट परीक्षेत यशाला गवसणी घातली. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून टाळेबंदीच्या काळातही त्याचे शेतीत राबणे सुरुच होते. अभ्यासात सातत्य राखल्यानेच यश मिळाल्याचे तो सांगतो. मोबाईलपासून स्वत:ला दोन वर्षांपासून लांब ठेवल्याने अभ्यासात गुंतवून घेतले. त्याचा फायदाच झाला. यामुळे पहिल्या प्रयत्नातच आपण यशस्वी झालो. आपल्या यशाचे गमक तो अशा शब्दात सांगतो. मुलाच्या यशाने आई-वडिलांसह काका-काकूही आनंदून गेले आहे. मुलाने आमच्या मातीतल्या कष्टाचे पांग फेडले, अशी प्रतिक्रिया संकेतची आई प्रतिभा व वडिल बाबूलाल यांनी व्यक्त केली. संकेतला नीट परीक्षेसाठी येथील प्रा.श्रीकांत मोरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दरदिवशी सहा ते सात अभ्यास, शंकांचे निरसन आणि सातत्य याबळावरच नीट परिक्षेत यशाची मोहोर कोरली. माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बाहेरगावी जावून क्लासेस लावू शकलो नाही. चाळीसगावी राहूनच अभ्यास केला. जिद्द आणि ध्येयावरचा फोकस अढळ ठेवला तर यश हमखास मिळतेच.
- संकेत बाबूलाल महाजन, चाळीसगाव