मुक्ताई नगर (जळगाव) : एकनाथ खडसे यांना भाजप तिकीट देत नसल्याच्या निषेधार्थ रावेर येथील नानाभाऊ महाजन या कार्यकर्त्याने रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वत: खडसे व कार्यकर्त्यांनी त्याची समजूत घातली. एकनाथ खडसेंनाभाजपाकडून तिकीट मिळणार नसल्याचं जवळपास फिक्स झालंय. स्वत: खडसेंनीच पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही खडसेंनी सांगितले.
मुक्ताई नगर येथील खडसे फार्म हाऊससमोर खडसेंना भाजपाने उमेदवारी न दिल्याचा निषेधार्थ कार्यकर्त्यांची निदर्शने आणि रास्ता रोको केला. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये संतप्त व रोष दिसत असून खडसे फार्महाऊसमध्ये जमलेले सर्वच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आशिया महामार्ग क्रमांक 46 पूर्णपणे ठप्प झाला असून जवळपास दोन किलोमीटरपर्यंत रांगा दुतर्फा लागलेल्या आहेत. निदर्शनस्थळी पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी हजर झाला असून तालुका व जिल्हा घरातील विविध पदाधिकारी व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. येथील रास्तारोको दरम्यान, एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा इशारा दिला होता. मात्र, खडसेंनी स्वत: फोनवरुन कार्यकर्त्याची समजूत घातली.
दरम्यान, एकनाथ खडसेंचं तिकीट कापण्यात आलं असून त्यांची कन्या रोहिणी हिला तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपाच्या तिसऱ्या यादीची प्रतीक्षा महाराष्ट्राला लागली आहे.