महेश कौंडिण्य ।पाचोरा : निर्मिती, सर्जनशीलता म्हणजे बाह्यविश्व आणि अंतर्गतविश्व अर्थात आपली चेतना किंवा जाणीव याचा संगम असतो. कलाकृतीच्या निर्मितीत उगमस्थानाचा स्रोत शोधणे हे कष्टाचे ठरते पण काही कलाकार याला अपवाद असतात. त्यांच्या मनात प्रतिमांचे उधाण येते आणि ते कलावंत गगनभरारी घेतात. त्यांच्या हाताची जादू जेव्हा कॅनव्हासवर चालते तेव्हा रंगांना स्फुरण चढते आणि कुंचला बोलू लागतो. अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर यशाचे शिखर गाठणारे पाचोरा येथील नामवंत चित्रकार, शिल्पकार आणि रांगोळीकार असलेल्या जितेंद्र हिरामण काळे यांनी गाठले आहे. त्यांच्याशी ह्यलोकमतह्णने साधलेला हा संवाद.प्रश्न- चित्रकार, शिल्पकार आणि रांगोळीकार म्हणून आपली वाटचाल थोडक्यात कशी सांगाल?कुटुंबात कलेच्या क्षेत्रात कुणी नाही. वडील जिल्हा परिषदेत अकाउंटंट होते. त्यामुळे कलेशी फारसा कोणाचा संबंध नव्हता, पण असं म्हणतात कला ही जन्मजात असावी लागते. माझ्यातील हाच गुण हेरून गुरुवर्य सोनार यांनी मला दिशा दाखवली आणि मी ह्यात माझ करियर करू शकलो. एक उत्तम शिक्षक आणि सोबतच प्रिंटिंग क्षेत्रात एक यशस्वी उद्योजक म्हणूनदेखील नावलौकिक मिळवू शकलो.प्रश्न- साकारलेल्या कलाकृती कोणत्या?शेकडो कॅनव्हास पेंटिंग, निसर्ग चित्रे, सामाजिक विषयावर प्रबोधनपर पोस्टर, ९० बाय ४५ फुटात रांगोळीचा श्रीगणेशा तसेच याच आकारात नवरात्र उत्सवात दुर्गादेवीच्या रांगोळीची भव्य प्रतिमा, कागदी कपापासून २२ फुटचा गणपती, कापसापासून २२ फुटांचा गणपती, विविध धान्यापासून ९० बाय ४५ फुटात गणेशा, इन्स्टोलेशन पद्धतीत आठ प्रकारचे क्रिएटिव गणपती अशा अनेक उपक्रमांमधून माझ्यातील चित्रकार, शिल्पकार, रांगोळीकार आणि एक संवेदनशील कलावंत मी जपण्याचा प्रयत्न केला. सलग सात वर्ष माझे सहकारी कलावंत मित्र राहुल पाटील आणि सुबोध कांतायन यांच्या मदतीने मी हे उपक्रम राबवूू शकलो.प्रश्न- प्रिंटिंग क्षेत्रात कसा प्रवेश झाला?माझा स्नेही मित्र राहुल पाटील आणि मी आम्ही दोघ एकत्र येवून १५ मार्च २०१५ मध्ये डिजिटल आर्ट क्रिएशन्स क्षेत्रात प्रवेश केला आणि केवळ हॅक काम्प्युटर आणि इच्छाशक्ती याच्या जोरावर एक छोटासा गाळा भाड्याने घेऊन सुरुवात केली. आज अभिमानानं सांगावसं वाटतं की, ही केवळ सहा वर्षात आम्ही स्वत: ४० लाख रुपयांपर्यंतचा भांडवल उभं करू शकलो.प्रश्न- यशाचे गमक काय सांगाल?अहोरात्र प्रामाणिक मेहनत करण्याची तयारी असेल तर निश्चित यश मिळणारच आहे. स्वत:च्या अंगी असलेल्या उपजत चित्रकलेच्या गुणांमुळे पाचोरेकरांसाठी नावीन्यपूर्ण कलात्मक डिझाईन्सच्या बॅनर, पत्रिका, जवळपास सर्वच प्रिंटिंग क्षेत्रात हळूहळू आम्ही नाव तयार केलं. आज आमचे तिसरे सहकारी अमोल ठाकूर यांच्या मदतीने आम्ही इव्हेंट मॅनेज करत असतो. आज आमच्यासोबत चार तरुणांना आम्ही रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाला थोडा हातभार लावू शकलो याचे खूप समाधान आहे.प्रश्न- आपल्याला मिळालेले सन्मान आणि पुरस्कार?औरंगाबाद येथील अखिल भारतीय मानव समाज विकास केंद कलारत्न पुरस्कार, राळेगणसिद्धी येथील निसर्गभूषण तसेच उपक्रमशील कलाध्यापक जळगाव जिल्ह्यातील खान्देशरत्न, पाचोरा आयकॉन, कुबेररत्न पुरस्कार सोलापूर तसेच अनेक कला प्रदर्शनात त्यांच्या कलाकृतींचे आयोजन करण्यात आले.प्रश्न- यशात कोणाचा वाटा?आई, वडील, माझे गुरू, मित्र आणि माझी पत्नी विद्या यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले. कारण शाळा सांभाळून हे क्षेत्र सांभाळणे थोडं जिकिरीचं होतं.प्रश्न- तरुणांना या क्षेत्रात यश मिळावे म्हणून काय मार्गदर्शन कराल?कोणतेही क्षेत्र लहान किंवा मोठे नसते. आपल्या मेहनतीने आपण उत्तुंग शिखर गाठू शकतो. आज प्रिंटिंग क्षेत्र हे सर्वव्यापी आहे. खूप वाव आहे. एखाद्या क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्यात यश मिळवण्याच्या अनेक वाटा आपोआप दिसायला लागतात. मेक इन इंडियाची निर्मिती आपल्या बळावर आपण करू शकतो.
संडे स्पेशल मुलाखत- हाताची जादू कॅनव्हासवर, तेव्हा रंगांना स्फुरण चढते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 9:11 AM
संडे स्पेशल मुलाखत
ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादकलाकार नव्हे तर कुंचला बोलू लागतो