लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात सुनील झंवर व माजी अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांची अजूनही भागमभाग सुरूच आहे. दोघंही न्यायालय हजर झाले नाहीत, किंवा पोलिसांना ते मिळून आलेले नाहीत. दरम्यान, याच प्रकरणात अटकेत असलेल्या महावीर जैन याच्या जामीन अर्जावर मंगळवारी पुण्याच्या विशेष न्यायालयात कामकाज होणार आहे. दोन दिवसापूर्वीच ठाकरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सुनील झंवरचा मुलगा सूरज झंवर याचा अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळलेला आहे.
पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीणमधील एक अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे महावीर जैन यानेही उच्च न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला होता. आता पुन्हा त्याने पुण्याचे विशेष न्यायाधीश गोसावी यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यातच सुनील झंवर याला उच्च न्यायालयाने अटकेपासून दोन आठवडे सरंक्षण दिले होते, त्या कालावधीत त्याने पुण्याच्या विशेष न्यायालयात जावून जामीन अर्ज व इतर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र झंवरने त्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून त्याचे संरक्षण काढून घेतले आहे. झंवर व कंडारे या दोघांनी फरार घोषीत करण्याचे वारंटही रद्द करुन घेतले होते. परंतु आता दोघांच्या अटकेचाही मार्ग मोकळा झाला आहे.
सूरज झंवर पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. या गुन्ह्यात जामीन व्हावा तसेच रिमांड व फिर्याद रद्द करण्यासाठी त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती प्रसन्न वराडे व न्या.मोडक यांच्या पीठाने त्याचा जामीन अर्ज व याचिकाही फेटाळून लावली आहे.