आश्चर्यम...द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:12 AM2021-05-03T04:12:05+5:302021-05-03T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अहो आश्चर्यम...अधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला नव्हे तर द्वितीय ठरलेला विद्यार्थिनीला विद्यापीठाने सुवर्णपदक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अहो आश्चर्यम...अधिक गुण मिळवून प्रथम आलेल्या विद्यार्थिनीला नव्हे तर द्वितीय ठरलेला विद्यार्थिनीला विद्यापीठाने सुवर्णपदक जाहीर केले असल्याची बाब महाराष्ट्र स्टुडंट संघटनेने समोर आणली आहे. ही चूक संघटनेने विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
विविध अभ्यासक्रम व विषयात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दीक्षान्त समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दीक्षान्त समारंभ ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. मात्र, त्याआधी विद्यापीठाने सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यात विधी अभ्यासक्रमातील लॉ ऑफ क्राईम विषयात १०० पैकी ५९ गुण मिळविणाऱ्या संजना कुकरेजा हिला गुरुवर्य ॲड. अच्युतराव अत्रे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. मात्र, लॉ ऑफ क्राईम या विषयात डिंपल पटेल हिने ६३ गुण मिळविले असून ती प्रथम ठरली असल्याची बाब मासूने समोर आणली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनालादेखील त्यांनी माहिती दिली असून हा पुरस्कार डिंपल पटेल हिला जाहीर करण्यात यावा, अशी मागणी मासूने केली आहे.
कुलगुरूंना दिली माहिती
दरम्यान, हा प्रकार कळताच, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य संघटक अरुण चव्हाण व प्रदेश सहसचिव दीपक सपकाळे यांनी तत्काळ संपर्क साधून माहिती दिली व ऑनलाईन निवेदनदेखील पाठविले. विद्यापीठाकडून झालेली चूक तत्काळ सुधारून पात्र विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
---------------
तांत्रीक चूक होती. ती आम्ही दुरूस्त केली. जिला अधिक गुण आहेत, तिला सुवर्णपदक जाहीर केले आहे. -बी.पी.पाटील, परीक्षा संचालक