आम्हाला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील माध्यमिक शाळेत मराठी शिकवायला डी.एस.पाटील नावाचे शिक्षक होते. ते कविता खूप छान शिकवायचे. छंदोबद्ध कविता असेल तर ते अतिशय सुंदर चाल लावून ऐकवायचे, शिकवायचे. मग आम्ही मुलं त्या कविता पाठ करायचो. चाल लावून म्हणायचो. त्यानंतर कवितेचा नादच लागला होता. तेव्हापासून कविता मनात रुंजी घालत होती. घरी रेडिओ असल्यामुळे आकाशवाणीवरील मराठी कवितांचा कार्यक्रम, मराठी गाणी वगैरे यांचाही लळा लागला होता. हे सारे संस्कार मला समृद्ध करणारेच होते.पदवीच्या प्रथम वर्षाला असताना माझ्या घुसर्डी गावातील मित्रांसोबत पावसाळी दिवसात पन्हाळा, सिंहगड अशा ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेथील निसर्ग सौंदर्यांने मी भारावलो होतो. खूप आकर्षित झालो होतो. त्या निसर्गाच्या विविध छटांनंतर कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्या होत्या.प्रारंभी माझ्या लेखनाची सुरुवात निसर्गकवितेने झाली होती. पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर निसर्ग कविता आपोआपच मागे पडत गेली.पदव्युत्तर शिक्षण घेताना मराठी साहित्याचा इतिहास बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय साठोत्तरी मराठी वाङ्गमयीन प्रवाहांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यात दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी इत्यादी वास्तववादी साहित्य प्रवाहांनी मला झपाटून टाकले होते. कवी नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, त्र्यंबक सपकाळे, केशव मेश्राम इत्यादी कवींनी तर अस्वस्थ केले होते. शिवाय ग्रामीण साहित्यिकांनीही अंतर्मुख केले होते. खरं म्हणजे दलित साहित्यानं जगणं शिकवलं अन, ग्रामीण साहित्यानं लिहिणं.मी स्वत: ग्रामीण भागातला, शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे ग्रामीण साहित्यात प्रकटलेले जीवन मला अधिक जवळचे वाटू लागले होते. म्हणून मी पुढे ग्रामीण साहित्य झपाटल्यासारखे वाचू लागलो. म.फुले यांच्यापासून तर गो.नि. दांडेकर, श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, बहिणाबाई चौधरी, उद्धव शेळके, बी.रघुनाथ, आनंद यादव, रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, विठ्ठल वाघ, उत्तम कोळगावकर, रंगनाथ पठारे, राजन गवस, भास्कर चंदनशिव, देशमुख, इंद्रजीत भालेराव, ग्रामीण साहित्यिकांचे लेखन आस्थेने वाचू लागलो.कारण त्या साहित्यातले जगणे, त्यातील दु:खवेणा मला माझ्या, माझ्या कुटुंबाच्या आणि एकूणच तमाम ग्रामीण-शेतकरी वर्गाच्या वाटू लागल्या होत्या. ते वाचून आपणही आपले जगलेले, भोगलेले अनुभव शब्दबद्ध करू शकतो ही प्रबळ जाणीव निर्माण झाली. पुढे त्यातून मला लेखनाची प्रेरणा मिळत गेली.- प्रा.डॉ.रमेश माने, अमळनेर, जि.जळगाव
भोवतालच्या वास्तवाने लिहिता झालो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 5:45 PM