लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पावसाळा सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील जीर्ण, पडावू व धोकादायक ६० इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. मात्र पावसाळा तोंडावर येऊनही संबंधित घरमालक, भाडेकरूंना अद्याप नोटिसा बजावल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पावसाळ्यात विशेषतः संततधार पावसात कच्ची,जुनाट व जीर्ण झालेल्या इमारती पडण्याची भीती असते. अशामुळे नाहक काही जणांना अपघातालाही सामोरे जावे लागते. या इमारती ढासळल्यास जीवित व वित्तहानीही होऊ शकते. याचा धोका ओळखून पालिकेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
दरम्यान, शहरातील धोकादायक इमारतीचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात आले असून त्याबाबतच्या नोटिसा तयार आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे नोटिसा बजावल्या गेल्या नाहीत. मात्र येत्या दोन-तीन दिवसांत संबंधितांना नोटिसा बजावल्या जातील, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.
चोपड्यात नदीकाठावरील १०० जणांना नोटिसा
चोपडा : चोपडा नगरपालिकेने दोन भिंत आणि एक इमारत पाडण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. दोन जण बाहेर गावी असल्याने नोटिस देण्यात अडचणी येत आहे. शहरात एक जण स्थायिक असल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. परंतु दोन जण मालक बाहेरगावी आहे. त्यांचा पूर्ण पत्ता मिळत नसल्याने दोन जणांना नोटीस देरण्यात अडचण आली आहे. तसेच नदीकाठावरील अतिक्रमणधारक नागरिकांना नोटीस बजावून व्यवस्था करून घ्यावी असे जवळपास शंभरच्यावर नागरिकांना नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे.अशी माहिती बांधकाम विभागातील राजेंद्र बाविस्कर यांनी दिली.