लोकमत न्युज नेटवर्क
एरंडोल : येथील आदर्श नगर मधील रहिवासी व राज्यशासन पुरस्कृत आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा बुधवारी पळासदळ शिवारात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृत्यू मागे नेमके कोणते कारण आहे हे अजून अस्पष्ट आहे.
दरम्यान पोलिस तपासात काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागून आहे.
किशोर पाटील यांचा मृतदेह अंजनी धरणाच्या मार्गाचे प्रवेशद्वार जवळ सुमारे १०० फुटाचे अंतरावर आढळून आला. मंगळवारी सायंकाळी ते भुसावळ येथे एका कार्यक्रमाला गेले असल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर मृतदेहाच्या स्थितीवरून त्यांचा घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पाटील हे गेल्या चार वर्षापासून गालापूर येथे आदिवासी भिल्ल वस्तीतील शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यासुद्धा गालापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचा पंचनामा करून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. त्यांच्या नातेवाईकांच्या मागणीवरून जळगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
घटनेबाबत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे.