अमळनेरातील जलतरण तलाव पाच वर्षांपासून रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 03:53 PM2021-06-06T15:53:10+5:302021-06-06T15:53:58+5:30
जलतरण तलाव रखडल्याने पैसा वाया जाणार असल्याचे चित्र आहे.
संजय पाटील
अमळनेर : क्रीडांगण विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील जलतरण तलाव आणि इनडोअर हॉल असे दोन मोठे प्रकल्प निधीअभावी गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहेत. पाच वर्षात बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने आता या प्रकल्पाची किमतदेखील वाढली असल्याने शासनाचा अर्धवट खर्च झालेला पैसा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑलिम्पिक स्तरावरील तलावाची साईज
२०१७ मध्ये क्रीडांगण विकास प्रकल्प अंतर्गत ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलला सुमारे एक कोटी ३२ लाख रुपये किमतीचा जलतरण तलाव मंजूर झाला होता. शासनाकडून ९० लाख रुपये रक्कम मिळणार होती. ७५ बाय २०० फुटांचा ऑलिम्पिक स्तरावरील तलावाची साईज असून २७० फूट संरक्षक भिंत आहे. फिल्टरेशन प्लांट आणि स्वछतागृह या सह सुरुवातीला ३, ५, ७ आणि ११ फूट खोलीचे स्तर होते. मात्र ११ फूट खोलीचा स्तर अपघातांमुळे शासनाने रद्द करून अंतिम खोली ७ फूट ठेवली आहे.
आता जादा निधी आवश्यक
शाळेला शासनाकडून पहिला हप्ता २९ लाखांचा मिळाला. त्यात १० लाख रुपये बँकेत अनामत रक्कम जमा आहे. १९ लाख रुपये खर्च झाले. संस्थेने ४२ लाख रुपये खर्च केले आहेत. फिनिशिंग वर्क बाकी आहे. कामाचे ऑडिट झाले असून वेळोवेळी अभियंते आणि क्रीडा अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. प्रकल्पाची किंमत वाढल्याने आता जादा निधी आवश्यक आहे अन्यथा झालेला खर्च वाया जाणार आहे.
बंदिस्त सभागृहाचेही काम रखडले
त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेला २०१४ मध्ये देखील ४० बाय २५ बाय १२.५० मीटर आकाराच्या दीड कोटींच्या बंदिस्त सभागृहाची ९० लाख रुपये शासनाचे अनुदान मंजूर झाले होते. त्यातील पहिला हप्ता ४५ लाख रुपये येऊन खर्चदेखील झाला आहे. परंतु याचाही दुसरा हप्ता जिल्हा नियोजन विभागाकडून शासनाने परत मागवल्याने हा प्रकल्पदेखील रखडला आहे. गेल्या काही वर्षात रेती, सिमेंट, लोखंड आदी साहित्याच्या किमती तिप्पट झाल्या आहेत.
९० लाख रुपये अनुदानाला मंजुरी
नुकतेच आमदार अनिल भाईदास पाटील यांनी क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहाय्य अनुदानातून प्रयत्न करून नगरपालिकेला १ कोटी २० लाख रुपये अपेक्षित खर्चाच्या तलावासाठी शासनाकडून ९० लाख रुपये अनुदानाला मंजुरी मिळवली आहे. माजी आमदार साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी यासाठी मागणीचा पाठपुरावा केला होता.
अनुदानाचा दुसरा हप्ता सध्याच्या शासनाने परत मागवल्याने प्रकल्प रखडला आहे. शासनाचा पैसा वाया जाणार आहे. पुढील हप्ता मिळावा.
-पराग पाटील, संचालक, ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर
जलतरण तलावाच्या कामाला अपेक्षित खर्च न झाल्याने पुढील अनुदान देण्यात येणार नाही. तर बंदिस्त सभागृहाच्या कामाचा व झालेल्या खर्चाचा प्रस्ताव पाठविल्यास अनुदान मिळू शकते.
-मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव