लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद करण्यात आला होता. आता प्रशासनाने परवानगी दिली आहे. तरी देखील हा जलतरण तलाव बंदच आहे. या काळात ठेकेदाराने पैसे न भरल्याने हा ठेका रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा क्रीडा संकुल समितीने नवीन निविदा काढली आहे.
२०१२ पासून बंद असलेला हा जलतरण तलाव २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. त्यावेळी भुसावळच्या एका ठेकेदाराने हा तलाव चालवण्यासाठी घेतला होता. त्यानंतरच्या काळात कोरोना संसर्गामुळे पुन्हा मार्च २०२० पासून सर्वच जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. आता काही अटी शर्ती कायम राखून जलतरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही देखील आता जिल्हा क्रीडा संकुल समितीने जुन्या ठेकेदाराचा करार रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढली आहे. त्यासाठी १७ जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पैसे न भरल्याने सुरू झाला होता वाद
भुसावळच्या ठेकेदाराने २०१८ पासून जलतरण तलाव चालवण्यासाठी घेतला होता. त्यानंतर २०१९-२० या कालावधीचे पैसे ठेकेदाराने भरले नव्हते. त्याशिवाय अन्य बाकी देखील त्याच्याकडे होती. त्यामुळे संकुल समितीने ठेकेदाराला काही महिन्यांपासून वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र तरी देखील ठेकेदाराने पैसे न भरल्याने हा ठेका रद्द करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा जिल्हा क्रीडा संकुल समितीने जलतरण तलाव चालवण्यासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे.