जळगाव जिल्ह्यात ४२ मद्य विक्री दुकानांवर कारवाईची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:59 PM2020-05-10T12:59:56+5:302020-05-10T13:00:35+5:30
जिल्ह्यात २२१ दुकानांना मद्य विक्रीची परवानगी
जळगाव : लॉकडाउन काळात नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या मद्य विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ४२ मद्य विक्री दुकानांवर विभागीय गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर अंतिम कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तयार केले जात आहेत. परवाना निलंबन, रद्द किंवा दंडात्मक यापैकी एक कारवाई होऊ शकते. लॉकडाऊनमध्ये उल्लंघन केल्याचा सर्वांनाच गुन्हा केला आह.
दरम्यान, लॉकडाऊन काळात अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्स, चाळीसगाव येथील क्रिश वाईन, जळगाव येथील अजिंठा चौकातील आर.के. वाईन्स व आमदार सुरेश भाळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावे असलेल्या पोलन पेठेतील नीलम वाईन्स यांचा मद्य विक्रीचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. उर्वरित दुकानांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.
क्रिश ट्रेडर्सचे कनेक्शन अमळनेर व नंदुरबार येथे जोडण्यात आल्याच्या संशयावरुन तेथीलही मद्य विक्री दुकानांची तपासणी झाली. त्यात अमळनेर येथील १५ मद्य विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नंदुरबारच्या सोनी ट्रेडर्सचा परवानाही कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
जळगाव-अमळनेर कनेक्शन
अमळनेर येथे २३ एप्रिल रोजी मद्य विक्री दुकान व बारची तपासणी करण्यात आली. त्यात १५ मद्य दुकानांमध्ये मद्यात तफावत तर रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले होते. या दुकानांमध्ये नरेश लिकर्सच देशी दारु दुकान, एस.के. ललवाणी यांचे देशी दारु दुकान, सुनीता भरत ललवाणी यांचे देशी दुकान, एच.टिल्लुमल कंपनीचे वाईन शॉप, भरुचा ब्रॅँडी हाऊसचे वाईन शॉप, हॉटेल न्यू योगेशचे परमीट रुम, हॉटेल प्रतिभाचे परमीट रुम, हॉटेल राजा गार्डनचे परमीट रुम, हॉटेल साई प्रसादचे परमीट रुम, हॉटेल उदयचे परमीट रुम, हॉटेल आरामचे परमीट रुम, हॉटेल कुणालचे परमीट रुम, हॉटेल सम्राटचे परमीट रुम, हॉटेल पायल व हॉटेल पूनमच्या परमीट रुमचा समावेश आहे.
शहरात सात ठिकाणी तफावत
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय नोतवाणी यांचे नशिराबादचे विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. यात सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. एन.एन.वाईन्स व नीलम वाईन्स येथे मुदतबाह्य बियरचा साठाही आढळून आला होता. त्यानंतर शनी पेठ पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका कारमधून अवैध मद्यसाठा पकडला होता.चौकशीअंती ही दारु हॉटेल पांचाली मधून आणल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या हॉटेलची तपासणी केली असता तेथेही मद्यसाठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे या परवानाधारकावरही विभागीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनंतर दुकान सुरु करण्यास परवानगी
लॉकडाउनमध्ये काही अंशी शिथीलता मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटी-शर्तीवर जिल्ह्यात २२१ मद्य विक्री दुकानांना परवानगी दिली आहे. त्यात बियर शॉप १०१, देशी दारु दुकान ९९ तर २१ वाईन शॉपचा समावेश आहे. दरम्यान, दुकाने सुरु करण्याची परवानगी देताना त्यात पक्षपातीपणा केल्याची तक्रार पोलन पेठेतील वाईन किंगचे मालक सुनील भंगाळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहिवडे यांच्याकडे केली होती. शहरातील १२ दुकानांना परवानगी देताना वाईन किंगलाच वेगळा नियम का लावण्यात आला असा जाब त्यांनी विचारला होता. या तक्रारीनंतर दुसऱ्याच दिवशी दुकान सुरु करण्याची परवानगी मिळाली. दरम्यान, आता आपले दुकान सुरु करण्यास परवानगी मिळाल्याचे सुनील भंगाळे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ४२ मद्य विक्री दुकानांवर विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या-त्या निरीक्षकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईचा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जात आहेत. जळगाव व बीड या दोन जिल्ह्यांचा पदभार आहे. त्यामुळे बीडमधूनच प्रस्ताव आॅनलाईन जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जात आहे. सर्वच दुकानांवर टप्प्याटप्प्याने कारवाई होईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.
-नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क