जळगाव - गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. त्यावेळी कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून सर्वत्र आर्सेनिक अल्बम ३० हे होमियोपॅथीचे औषध दिले जात होते. त्याच काळात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनयुक्त आहार रुग्णांना दिला जात होता. मात्र यावेळी दुसऱ्या लाटेत कोविड-१९ ची लक्षणे काही प्रमाणात बदलली आहेत. आधी प्रतिबंधात्मक म्हणून दिले जात असलेले आर्सेनिक अल्बम ३० च्या ऐवजी आता आर्सेनिक अल्बम २०० हे रुग्णांना उपचारादरम्यान दिले जात असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
लोकमतने होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात आर्सेनिक अल्बम ३० हे औषध कोरोनापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिले जात होते. मात्र आता जे रुग्ण समोर येत आहेत. त्यांची लक्षणे देखील वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता रुग्णांना आर्सेनिक अल्बम ३० देण्यापेक्षा आर्सेनिक अल्बम २०० हे दिले पाहिजे. अगदी गंभीर स्थितीतही या औषधामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर होते. इतर रुग्णांना त्याच्या गोळ्या दिल्या तरी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना त्याचे थेंब दिले गेले पाहिजे. त्यामुळे रुग्णांची ऑक्सिजन पातळी स्थिर राहते. त्यासोबतच कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर हे मशीनदेखील फायदेशीर ठरेल. या मशीनने घरीच एकाच वेळी दोन रुग्णांना ऑक्सिजन देता येतो, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. अश्विनी धताते यांनी सांगितले की, ‘कोरोना रुग्णांमध्ये व्हिटॅमिन सी हे महत्त्वाचे ठरते. त्यावर रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लिंबू आणि संत्राचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. रुग्णालयात आम्ही रुग्णांना काढा देतो. त्यात लिंबू असते तसेच फळांमध्ये संत्री देण्यावर आमचा भर असतो. रुग्णांना प्रोटीनची जास्त गरज असते. त्यामुळे दररोज एक उकडलेले अंडे दिले जाते. त्यासोबतच कडधान्याची उसळ, दाळींचे वरण यातूनही रुग्णांची प्रोटीनची गरज भागते. रुग्णांना आम्ही सकाळी गरम पाणी देतो. त्यानंतर काढा, एक उकडलेले अंडे दिले जाते. नाश्त्यात पोहे, उपमा, उसळ यांचा समावेश असतो. जेवणात वरण- भात, भाजी पोळी दिली जाते. मधल्या वेळेत रुग्णांना फळे देणे फायदेशीर ठरते.