लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या कोरोनाचा चांगलाच कहर जिल्ह्यात सुरू आहे. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मुलांना घराबाहेर पडायला मिळत नाही. पण आई-बाबा मात्र दिवसभर कामानिमित्त घराबाहेर ये-जा करत आहेत. हे सर्वजण जरी घराबाहेर ये-जा करत असले आणि घरी परतल्यावर कोरोना पसरू नये, म्हणून काळजी घेत असले तरी त्यांनी बाहेर फिरू नये, त्याऐवजी घरीच थांबून आपल्यासोबत वेळ घालवावा, अशी गोड तक्रार घरातील मुले आता करू लागली आहेत.
गेल्या वर्षभरापासून ना शाळा, ना पुस्तक, ना दररोजचा अभ्यास, त्यामुळे मुले हवीतशी खेळत आहेत. पण घरातच आहे. जरा काही मोठ्या मुलांना बंधनांपासून मुक्तता मिळाली होती. पण ती देखील आता पुन्हा शाळा बंद झाल्याने अडकली आहे. आता घरात बसून वैतागलेली मुले आपल्या पालकांकडे हट्ट धरत आहेत की घरीच बसा, कुठे बाहेर जाऊ नका, आपण घरातच धम्माल करू. पण पालकांना हे ऐकायला कुठे वेळ आहे. कोरोनाचे नियम पाळणे बरेच टाळत आहे. वेळोवेळी हात स्वच्छ करीत नाही. सॅनिटायजरचा वापर करत नाही. तसेच कुठेही फिरताना मास्क वापरत नाहीत.
काय आहेत नियम
कोरोना टाळण्यासाठी शासनाने सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यासोबतच सामाजिक अंतर पाळणे सक्तीचे केले आहे. मास्क न वापरल्यास ५०० रुपयांचा दंड देखील केला आहे. जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त जणांना विनाकारण एकत्र फिरता येणार नाही. यासोबतच अनेक कठोर नियम लागू करण्यात आले आहे.
कोट.
कोरोनाने सर्वजण घरात आहेत. आई-बाबा कामासाठी तेवढे घराबाहेर जातात. मास्क वापरतात. घरी आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुतात, मात्र त्यांनीही आता घराबाहेर जाऊ नये. - नितीन गवळी
कोरोना सगळीकडे वाढतोय. आता आम्ही घरात आहोत. तर सर्वांनीच घरीच थांबावे, एकदा कोरोना गेला की मग सगळेच बाहेर जायला मोकळे होतील. - संजना तांदळे
कोरोनामुळे बाहेर पडणे कठीण झाले. वडील कामासाठी बाहेर जातात. त्यावेळी ते मास्क लावुनच घराबाहेर पडत आहेत. असे असले तरी आता त्यांनी देखील काही दिवस का होईना पण घरूनच कामे करावी - रोहित हटकर
वडिलांना बाहेर जावे लागते. ते मास्क लावूनच दाराबाहेर पडतात. मात्र त्यांनी आता घरी थांबावे. ते घरी असतील तर मज्जा येईल - नंदिनी पाटील
वडील घरी असले तर मज्जा येईल. त्यांना बाहेर जावे लागते. मात्र आता ते देखील विनाकारण बाहेर पडणे टाळतात. बाहेर जातांना मास्क लावून जातात. घरी आल्यावर सॅनिटायजरचा वापर देखील करतात - अनिशा पाटील
आम्ही घरात आहोत. शाळा बंद, घराबाहेर खेळणे बंद त्यामुळे सर्वजण घरी असले तर आम्हालाही त्यांच्यासोबतच खेळता येईल. घरातच राहून सर्वजण मज्जा करू शकतो- विशाखा अस्वार
घरी थांबणे सर्वांनाच परवडणारे नाही. मात्र आमचे कुटुंब आई, बाबा योग्य ती काळजी घेत आहेत. सर्वांनीच काळजी घ्यावी, कुणीही मास्क शिवाय बाहेर पडू नये - गणेश लोखंडे