जळगाव : कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिले.जळगाव जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांचा आढावा तसेच विद्यापीठ नामविस्तार आनंद सोहळा व नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे जळगावात आले आहेत. या वेळी नियोजन भवनात जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प व विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या ४८ योजना मार्च अखेर पूर्ण करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.तसेच राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावे समाविष्ट असल्यास त्या योजना सौर ऊर्जेवर करण्यास प्राधान्य द्या, असेही ते म्हणाले.धरणगाव पाणीपुरवठा व भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी टाईमलाईन ठरवा, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर व एरंडोलच्या योजना सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:28 PM