एरंडोल : स्कुटी खडीवर घसरून शिक्षिका आणि त्यांचा मुलगा जागीच ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल ते धारागीर दरम्यान हॉटेल फाऊंटनपासून थोड्या अंतरावर गुरुवारी सकाळी सव्वानऊला ही घटना घडली. कविता कृष्णकांत चौधरी (वय ३७) आणि लावण्य कृष्णकांत चौधरी (वय १० वर्षे) (रा. विद्यानगर, एरंडोल) अशी मयत माय-लेकांची नावे आहेत.शहरातील विद्यानगरातील रहिवासी कविता कृष्णकांत चौधरी या चंदनबर्डी (जळू), ता.एरंडोल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्या आपल्या शाळेत स्कुटी (क्रमांक एमएच-१९-डीबी-८७७९) ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने निघाल्या. सोबत त्यांचा १० वर्षांचा मुलगा लावण्य हादेखील होता. वाटेत त्यांनी वाहनात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. त्यानंतर पुढे निघाले. अवघ्या पाच मिनिटात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पसरलेल्या खडीवर त्यांचे वाहन घसरले व पुढे चालणाऱ्या जीजे-२६-टी-८२६४ या क्रमांकाच्या ट्रकला धडकले. या अपघातात शिक्षिका मुलासह ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्या आणि माय-लेकांचा करुण अंत झाला.घटनेचे वृत्त समजताच परिसरातील नागरिक मदतीला धावत आले.दरम्यान, पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, संदीप सातपुते व सहकारी यांनी चाकाखाली अडकलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम संथ गतीने चालू असल्यामुळे या दोघं मायलेकाचा बळी गेला. आणखी कित्येक जणांचे प्राण या महामार्गावर जातील तेव्हा कुठे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल की काय, अशी जनमानसात चर्चा आहे.चौपदरीकरणाच्या कामामुळे आजवर अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काहींना त्यांचे कायमस्वरूपी अवयव गमवावे लागले आहेत. याला जबाबदार ठेकेदार, नही, प्रशासन की शासन याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एरंडोलनजीक स्कुटी खडीवर घसरून शिक्षिका आणि मुलगा जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:06 PM