शिक्षक पदोन्नतीची कार्यवाही तत्काळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:50+5:302021-05-07T04:16:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेने गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, अभावित केंद्रप्रमुख पदोन्नती केलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेने गेल्या अनेक वर्षांपासून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, अभावित केंद्रप्रमुख पदोन्नती केलेली नाही. परिणामी, जिल्ह्यातील दोनशेच्यावर शाळांमध्ये प्रशासकीय कामकाज प्रभारी शिक्षक बघतात. तसेच भाषा व गणित विषयांचे शिक्षक नसल्याने त्या विषयांचे अध्यापन इतर शिक्षक करतात. ही गंबीर बाब आहे. त्यामुळे पदोन्नतीची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जळगाव जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सर्वसाधारण बदल्या करण्यापूर्वी जळगाव जिल्हा परिषदेने पदोन्नतीची कारवाई केल्यास प्राथमिक शिक्षकांच्या तीनशेच्यावर जागा रिक्त होतील. एकल सेवा सर्व शिक्षकांच्या बदल्या सुरळीत होतील. त्यामुळे पदोन्नतीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. सद्य:स्थितीला जळगाव जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी यांची ६४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३८ शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असून २६ जागा अजूनही रिक्त आहेत. परिणामी, कार्यरत शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे अनेक कामांना विलंब होत आहे. दुसरीकडे मुख्याध्यापकांचीसुद्धा पदे रिक्त आहेत. तर केंद्रप्रमुखांचे देखील मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वत्र प्रभारी सुरू असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली शिक्षक भरतीदेखील रखडलेली आहे. तसेच पदोन्नती कधी होईल, याची प्रतीक्षा लागून आहे.