भुसावळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. अशात तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मदतीने ग्रामीण भागातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्रणाली कार्यान्वित केली आहे.
गटवकिास अधिकारी भाटकर यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी.डी. धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांच्या माध्यमातून ऑक्सिजन प्रणाली बसविण्याकरिता निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या निधीअंतर्गत कठोरा व पिंपळगाव बुद्रूक येथे बसवण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रणालीचे लोकार्पण गुरुवारी केले. गटविकास अधिकारी विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी बी. डी. धाडी, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, पंचायत समिती कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र फेगडे, वैद्यकीय अधिकारी राजू तडवी, नितीन सोनवणे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी. आर. चौधरी, एस. डी. भिरुड, भुसावळ तालका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.पी. सपकाळे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर, शिक्षक परिषदेचे एस. एस. अहिरे, माध्यमिक पतपेढीचे संचालक डॉ. संजू भटकर, विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष गजानन नारखेडे, पिंपळगाव बुद्रूक सरपंच ज्ञानदेव मावळे, ग्रामसेवक आर.एस. बोदडे आदींची उपस्थिती होती.
अडीच लाख रुपये जमा झाला निधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व शिक्षण विभागाने शिक्षक संघटनाना आवाहन केले. यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शंभर टक्के तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सत्तर टक्के शिक्षकांनी मदत केल्याने दोन लाख चाळीस हजारांची मदत जमा झाली. या मदतीतून कठोरा, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ तर पिंपळगाव बुद्रूक येथे ८ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. याबद्दल गटविकास अधिकारी भाटकर यांनी शिक्षकांचे कौतुक केले आहे.
ऑक्सिजन प्रणालीच्या लोकार्पणप्रसंगी विलास भाटकर, वैद्यकीय अधिकारी राजू तडवी, जे.पी. सपकाळे, आर.आर. धनगर, एस.एस. अहिरे, डॉ. संजू भटकर, राजेंद्र फेगडे आदी.