चुडामण बोरसे, आॅनलाईन लोकमत
दि़ १८, जळगाव : बारा एकर कोरडवाहू शेतीला बागायतीचे रूप देऊन शेतकºयाने एक वेगळा प्रयोग केला आहे. ते शिक्षकीपेशा सोडून काळ्या आईच्या सेवेत दाखल झाले आहेत़ अनेक पिकांमध्ये ठिबकवर आंतरपीक घेऊन त्यावर भरपूर प्रमाणात शेणखत वापरून विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आहे.मधुकर विश्राम पाटील (रा. गिरड, ता. भडगाव) असे या शेतकºयाचे नाव. एम.कॉम, बी.पी.एड. असे शिक्षण झालेले. पिंप्राळा येथील मुंदडा शाळेत ते शिक्षक होते. ही नोकरी सोडून त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला. त्या वेळी साहजिकच त्यांना विरोध झाला. पण मनाचा निश्चय कायम होता... तो म्हणजे काळ्या आईची सेवा करायचा. मध्यंतरी गिरडचे सरपंचपद त्यांच्याकडे होते. सध्या ते जिल्हा मजूर फेडरेशनवर संचालक आहेत. घरची वडिलोपार्जित १२ एकर शेती होती. ती आता २४ एकरापर्यंत पोहचली आहे. गिरणा नदीपात्राजवळच शेती आहे. त्यामुळे आधी विहीर खोदली. सुरुवातीला पाच एकर क्षेत्रात कपाशी लावली. त्यावर ठिबक सिंचन करायचे ठरविले. बँकेकडून कर्ज घेतले. या कपाशीमध्ये मका आणि भुईमुगाचे आंतरपीक घेतले. पहिल्याच वर्षी एकरी १५ क्विंटल कापूस निघाला. मका आणि भुईमुगाचेही चांगले उत्पन्न आले. यावर्षी त्यांनी १२ एकर क्षेत्रावर कपाशी लावली आहे. पाच बाय अडीच फूट अंतर ठेवले आहे. या कपाशीचा पहिला वेचा १० क्विंटल एवढा निघाल्याचे त्यांनी सांगितले़रोज सकाळी आणि संध्याकाळी चार तास ते शेतीसाठी देतात. या शेतीला मग त्यांनी दुग्ध व्यवसायाची जोड दिली. तीन म्हशी आणि गायी त्यांच्याकडे आहेत़ रोज त्यांचे किमान १८ लीटर दुधाचे संकलन होत असते.गेल्या वर्षी केळी आणि उसाचा प्रयोग करून पाहिला. चार एकरावर केळी होती. ऊस कन्नड कारखान्यात पाठविला. त्यालाही चांगला भाव मिळाला. एका हंगामासाठी ते पूर्ण शेतात एकरी पाच ट्रॅक्टर शेणखत, डीएपी ५ बॅग, पोटॅश २ बॅग, आणि युरिया १ बॅग तसेच मॅग्नेशियम सल्फेट एकरी २५ किलो याचा वापर करीत असतात. देशी गोमूत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करीत असतात. त्यामुळेच आपली यशाकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़ बांधावरील जमिनाचाही त्यांनी उपयोग करण्याचे ठरवून त्यासाठी बांधावर सागाची ५० झाडे लावली आहेत़एवढ्यावरच न थांबता ते शेतात प्रत्येक वर्षी वेगवेगळा प्रयोग करीत असतात. अनेकवेळा स्वत: फवारणी करीत असतात. एकाचवेळी त्यांनी आपल्या शेतात ऊस, केळी, मका, उडीद आणि भुईमूग पेरला आहे. यावर्षी मुगाचे आंतरपीक घेतले आहे. गेल्या वर्षी पाच पोते भुईमूग आणि तीन क्विंटल उडीद झाला होता़शेतकºयांनी आपल्या शेतात जास्तीत जास्त शेणखताचा वापर करावा, शेतीसाठी वेळ द्यायला हवा. शेती ही काळजीपूर्वकच करायला हवी तरच त्यात चांगले उत्पादन आणि यश मिळेल, असा माझा अनुभव आहे.