बदलत्या शिक्षण प्रवाहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओघ वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. दरम्यान, पटसंख्या कायम राखून नोकरी टिकवण्यासाठी व अतिरिक्त न ठरण्यासाठी मनवेल, थोरगव्हाण, पथराडे, शिरागड येथे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या शोधात गुंतले असल्याचे दिसून येते.
बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शहरी भागातील शाळांना विद्यार्थी व पालक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील पालकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकावीत, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी खासगी शाळांमध्ये जात आहेत. याचा परिणाम गावातील मराठी शाळांवर होत आहे.
विद्यार्थी मिळत नसल्यामुळे शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेची मान्यता, नोकऱ्या टिकवण्यासाठी शिक्षकांना पटसंख्या कायम राखणे गरजेचे झाले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून तेच विद्यार्थी आपल्या शाळेत सेमीत टाकून विद्यार्थी मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांवर मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील तुकड्या बंद पडत आहेत, तर पटसंख्या कमी होत आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विद्यार्थी मिळविण्यासाठी विविध आमिषेही पालकांना दाखविली जात आहे. पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांसमोर पाचवी व आठवीचे विद्यार्थी मिळविणे हे उद्दिष्ट आहे. एकदा विद्यार्थ्यांने पाचवीत प्रवेश घेतला की दहावीपर्यंत अडचण येत नाही. म्हणूनच विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून येत आहे.