शिक्षक संघटनांनी कुटीर रुग्णालयाला दिले जनरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:36+5:302021-05-27T04:16:36+5:30
एक माणुसकीचा मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधीलकी शिक्षक संघटनांनी जपली. पारोळा येथे कुटीर रुग्णालयात वारंवार विद्युत ...
एक माणुसकीचा मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधीलकी शिक्षक संघटनांनी जपली. पारोळा येथे कुटीर रुग्णालयात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी होत्या. याचा परिणाम थेट रुग्णांच्या वैद्यकीय सेवेवर पडत असे. ही विद्युत पुरवठाबाबतची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी एक जनरेटर या माध्यमातून घेऊन देण्यात आले. यावेळी किसान विद्या प्रसारक मंडळ पारोळा या संस्थेच्या वतीने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांच्याकडे सुपूर्द केला, तर माध्यमिक शिक्षक संघटनेकडून १ लाख २५ हजार, तर प्राथमिक शिक्षक संघटनेकडून एक लाख रुपये या निधीतून जनरेटर खरेदी करून त्याला जनरेटरसाठी कुटीर रुग्णालयात स्वतंत्र शेड ही बांधून दिले जाईल. तर शेतकरी संघटनेकडून व इतर सामाजिक ग्रुपच्या माध्यमातून संकलित झालेल्या निधीतून औषधी, ऑक्सिमीटर, थर्मल गन, मास्क, आदी साहित्य कुटीर रुग्णालयात लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
-----
चौकट -
आमदार घरात बसून
स्थानिक आमदार घरात बसूनच स्वतःचे अस्तित्व मात्र मंत्र्यांना विविध मागणीचे पत्रव्यवहार करून दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला यावेळी बोलताना डॉ. सतीश पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांचे नाव न घेता लगावला. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देणारे पाहिजेत. कोविडच्या काळात तालुक्याला कोणी वालीच नसल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. ते मतदारसंघासाठी वाईट आहे, असे यावेळी त्यांनी बोलून दाखविले. संपूर्ण तालुक्यासह मतदारसंघ हा वाऱ्यावर असल्याचा आरोप डॉ. सतीश पाटील यांनी यावेळी केला.
याप्रसंगी तहसीलदार अनिल गवांदे, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. शांताराम पाटील, शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल चौधरी, शिक्षकेतर संघटनेचे गोरख पाटील, माजी युवक अध्यक्ष किशोर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. मयूर पाटील, आदी उपस्थित होते.
छाया---पारोळा कुटीर रुग्णालयात जनरेटर घेण्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांच्याकडे सुपूर्द करताना यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, जिल्हा परिषोचे सदस्य रोहन पाटील, डॉ. शांताराम पाटील, अनिल चौधरी, डॉ. मयूर पाटील, किशोर पाटील, आदी उपस्थित होते.
२७सीडीजे ४