जिल्ह्यातील आधारची ९० केंद्रे तात्पुरती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:00 PM2020-02-24T13:00:15+5:302020-02-24T13:00:24+5:30
जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने ...
जळगाव : पूर्वी महाआॅनलाईन या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया आता महाआयटी या कंपनीमार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सध्या या कंपनीकडून सॉफ्टवेअर बदलण्याचे काम सुरू असल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
आधार नोंदणीसाठी एजन्सी म्हणून काम करणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा राज्य शासनासोबतचा करार संपल्याने आता महाआयटी या कंपनीशी शासनाने करार केला आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व आधार केंद्र सॉफ्टवेअर अपडेट करून या नवीन एजन्सी असलेल्या कंपनीशी जोडण्यात येणार आहे. मात्र हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ९० केंद्र बंद
जिल्ह्यातील १५० पैकी ९० आधार नोंदणी केंद्र सध्या या बदलाच्या प्रक्रियेमुळे बंद आहेत. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून महिनाभरात ही सर्व केंद्र नवीन एजन्सीशी जोडून सुरू करण्यात येणार आहेत. मात्र सध्या ९० केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.