ओपीडी घटली
जळगाव : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात याचा परिणाम नॉन कोविड ओपीडीवर झाल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापासून नॉन कोविड ओपीडी घटली असून शनिवारी तर नॉन कोविड क्षेत्रात पूर्णत: शुकशुकाट जाणवत होता.
एक्सरेची सुविधा
जळगाव : कोरोनाच्या सीटू कक्षात आता एक्सरेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याच ठिकाणी रुग्णांचे स्क्रीनींगही होत आहे. आवश्यकता वाटल्यास रुग्णांचा एक्सरे काढण्यासाठी याच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशयित रुग्णांना सी थ्री कक्षात दाखल केले जात आहे.
अपघाताची वाट
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर मल्लनिस्सारण योजनेच्या कामानंतर झालेल्या खड्ड्यांमध्ये मोठी खडी टाकण्यात आल्याने या ठिकाणची वाट अत्यंत बिकट झाली असून रुग्णालयात जाता दुचाकी घसरण्याचे प्रकार या ठिकाणी होत आहेत. रुग्णांच्या वाहनाला अपघात होण्याची शक्यता असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
फोटो आहे.
चोपडा हॉटस्पॉट
जळगाव : जळगाव शहरासह चोपडा तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून या ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या ही ५३२ वर पोहोचली आहे. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी या तालुक्यात १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
अन्य व्याधी धोकादायक
जळगाव : कोरोनाच्या संसर्गानंतर मृत्यू झालेल्यांमध्ये अन्य व्याधी असलेल्यांची संख्या ७०० असून अन्य व्याधी असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेच असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. एकूण १४०१ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील १२४२ रुग्णांचे वय हे ५० पेक्षा अधिक होते.
'पीएचसी'मध्ये लसीकरण
जळगाव : सोमवारपासून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात होणार आहे. उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी केंद्र वाढविण्यात येणार असल्याचे यंत्रणेचे म्हणणे आहे. पुरेसे डोस उपलब्ध असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. नवीन लोकांना पहिला व पहिला डोस झालेल्यांना दुसरा डोस दिला जात आहे.