कजगाव (जि. जळगाव) : भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीचे घर पाडण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.या बालिका अत्याचार प्रकरणात आरोपी स्वप्नील विनोद पाटील (वय १९) यास अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.
रविवारी राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी या गावाला भेट दिली आणि बालिकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत आमदार किशोर पाटील हे होते. मंत्री पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर महिनाभरात गुन्ह्यातील आरोपीला कडक शिक्षा होईल, यासाठी पावले उचलण्याबाबत सूचना दिल्या. यामुळे राज्यात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आरोपीचे घर पाडण्यात यावे, अशा सूचनाही केली. त्यावर आमदार किशोर पाटील यांनी आरोपीचे घर पाडण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांनीही असा ठराव असल्यास आपली काहीच हरकत नसल्याचे सांगितले.
मंत्री पाटील यांनी या पीडित बालिकेच्या परिवाराला ५० हजार रुपयांची मदत दिली. शनिवारी आमदार किशोर पाटील यांनी या परिवाराला ५० हजारांची मदत दिली होती. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पीडित कुटूंबाकडे एक लाख रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. तसेच येत्या दोन दिवसात भाजपच्या फंडातून दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे जाहीर केले.