रस्ते, वीज, पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादीने टाळ वाजून वेधले लक्ष; महापालिकेसमोर आंदोलन
By सुनील पाटील | Published: January 1, 2024 03:30 PM2024-01-01T15:30:29+5:302024-01-01T15:30:52+5:30
कामांची बोंबाबोंब, मक्तेदारांना मात्र वेळेवर बील
जळगाव : शहरात होत असलेले रस्ते, त्याचा दर्जा, कमी दाबाचा पाणी पुरवठा, दिवाबत्ती, अस्वच्छता आदी मुलभूत प्रश्नांच्या संदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने (शरद पवार गट) सोमवारी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेसमोर टाळ वाजून आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. शहरात या साऱ्या समस्या कायम असताना मक्तेदारांचे बील मात्र वेळेवर अदा केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना मानदुखी व पाठदुखीचे आजार लागले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. गेल्या पाच वर्षात नवीन रस्ते बनविण्यात प्रशासनाला अपयश आले. आता आयुक्तच प्रशासक असताना चार महिन्यात कुठलीच सुधारणा झालेली नाही. जे रस्ते सुरु झालेले आहेत त्यावर एकेक थर डांबरीकरण व खडिकरण झालेले आहे. कॉक्रीट रस्त्यावर पाणी मारले जात नाही.थर्ड पार्टी ऑडीट न होताच रस्त्याची बिले काढली जात आहेत. कॉक्रीटच्या रस्त्यात सिमेंट, स्टील व इतर साहित्य कमी वापरले जात आहे. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरातील बहुतांश भागात अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा होतो, पण तो अवेळी व कमी दाबाचा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.स्वच्छतेबाबतही अशीच परिस्थिती आहे.
रस्ते, गटारी व सार्वजनिक शौचालयांची साफसफाई होत नाही, परंतु या मक्तेदाराचेही बिल वेळेवर काढले जाते. शहरातील पथदिव्यांची दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत, ते सुरु करण्यास मक्तेदाराने नकार दिला आहे. प्रशासक म्हणून या साऱ्या समस्या तातडीने सोडव्यात व जळगावकरांना त्यातून दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगला पाटील, युवक अध्यक्ष रिंकु चौधरी, प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अमोल कोल्हे, वाय.एस.महाजन, इब्राहिम तडवी, वाल्मिक पाटील, सुहास चौधरी, डॉ.रिजवान खाटीक, पंकज तनपुरे यांच्यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.