विद्यापीठाकडून प्राध्यापकांना वेठीस धरण्याचे काम, प्राध्यापक संघटनेचा आरोप
By अमित महाबळ | Published: December 4, 2023 08:30 PM2023-12-04T20:30:46+5:302023-12-04T20:31:02+5:30
स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नंतर परीक्षा घेतली जाते.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेसाठी परीक्षांचे फेरनियोजन करताना प्राध्यापकांच्या सुट्ट्यांचा विचार केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. इतर स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नंतर परीक्षा घेतली जाते. त्याच धर्तीवर वेळापत्रक का केले नाही, असा मुद्दा एन.मुक्ताच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.
विद्यापीठात दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले पण नवीन तारखांचे नियोजन करताना पेपर आणि कॅपचे काम प्राध्यापकांच्या सुट्यांमध्ये घेण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापकांना झगडून मिळालेल्या सुट्यांचा काहीच फायदा होणार नसल्याचा दावा एन. मुक्ताचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांनी केला आहे.
आविष्कारामुळे दि. ११ ते १४ डिसेंबर दरम्यानचे पेपर आता दि. १८, १९, २० व २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. प्राध्यापकांना दि. १७ ते ३१ डिसेंबर दरम्यान हिवाळी सुटी आहे. मात्र, त्या दरम्यान परीक्षांचे नियोजन केले गेल्याने सुटीचे चार दिवस कमी झाले आहेत. परीक्षेनंतर महाविद्यालयांमध्ये कॅपचे (पेपर तपासणी) नियोजन सुट्ट्यांमध्ये केले गेले आहे. विद्यापीठाने प्राध्यापकांच्या सुट्या हिरावून घेतल्या आहेत. आता परीक्षा पुढे ढकलल्या आहेत मात्र, दिवाळीतील सुट्यांसाठी केलेल्या उपोषणावेळी हीच मागणी मान्य झाली नव्हती, असेही डॉ. बारी यांनी सांगितले.
आविष्कारमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निवडक विद्यार्थी सहभागी होतील, त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नव्हती. क्रीडा व इतर स्पर्धांमधील सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेतली जाते. त्याच धर्तीवर आविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा विचार का करण्यात आला नाही, असाही प्रश्न डॉ. नितीन बारी यांनी केला आहे.