शिवाजीनगर परिसरातील मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:36 PM2020-05-21T20:36:42+5:302020-05-21T20:38:09+5:30
गुन्हा दाखल : आतापर्यंत पाच वेळा चोरी
जळगाव : शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिरात सलग दोन दिवस चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला आहे. या मंदिरात चोरट्यांनी दोन दिवसात मंदिरातील तांब्याचे ४००कलश व एक पितळी समई असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. दरम्यान यापूर्वी या मंदिरात तीन वेळा चोरीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर परिसरातील शांतीनाथ डिगंबर जैन मंदिराचा गाभा बंद आहे. प्रमोद हिरालाल जैन (५५,रा. शिवाजीनगर) हे मंदिराचे पुजारी आहे. तेच फक्त पूजाविधीसाठी मंदिर उघडत असतात. बुधवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास पुजारी जैन यांनी पूजाविधीसाठी मंदिर उघडले असता त्यांना मंदिराच्या गाभा असलेल्या दरवाज्याला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. यानंतर गुरुवारीही सकाळी ५.३० वाजता मंदिर उघडले असता मंदिराच्या सभागृह असलेल्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. सलग दोन दिवसाच्या प्रकारानंतर पुजारी जैन यांनी प्रकार मंदिराच्या ट्रस्टींना ट्रस्टी प्रदिपकुमार सुरेंद्रनाथ जैन व राजेश जैन यांना कळविला. तसेच मंदिरात पाहणी केली असता, मंदिराच्या हॉलमध्ये असलेले १५ हजार रुपये किमतीचे ३०० तांब्याचे कलश तसेच गाभाऱ्यात असलेली एक हजार रुपये किमतची पितळी समई असा ऐवज एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविले असल्याचे समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयीत कैद
प्रदीपकुमार जैन यांनी परिसरातील फुटेज तपासले असता बुधवारी दोन इसम मंदिर परिसरात वावरत असल्याचे दिसून आले. तर मध्यरात्री मंदिराजवळ तीन संशयीत इसम फिरत असताना दिसून आले. फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या पूर्वी या मंदिरात तीन वेळी चोरी झाल्याची माहिती प्रदिपकुमार यांनी दिली. याप्रकरणी पुजारी प्रमोद जैन यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विजय निकुंभ करीत आहेत.