रुळावर झाेपलेल्या तरूणाचे ‘त्यांच्या’ तत्परतेने वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:30 PM2021-06-07T22:30:13+5:302021-06-07T22:32:58+5:30
इंजिन चालकाच्या समयसुचकतेने आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या तत्परतेने रेल्वे रुळावर झोपलेल्या तरुणाचे प्राण वाचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : इंजिन चालकाच्या समयसुचकतेने आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या तत्परतेने रेल्वे रुळावर झोपलेल्या तरुणाचे प्राण वाचल्याची घटना ७ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
अमळनेर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस बोरी नदीच्या अलीकडे काही अंतरावर एक युवक मेन डाउन ट्रॅकवर मान टाकून झोपला होता. सुरत मालदा एक्स्प्रेस अमळनेर स्टेशनहून सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास सुटल्यानंतर लोको पायलट राजेश आर, गार्ड बी. एल. मीना याना विप्रो पुलाच्या पुढे गेल्यावर बाजूच्या रुळावर त्यांना एक इसम रुळावर मान टाकून झोपलेला दिसून आला. त्यांनी तातडीने अमळनेर स्टेशन मास्तर ब्रजेश गुप्ता याच्याशी वॉकीटॉकीने संपर्क साधून घटना कळवली.
गुप्ता यांनी वेळ न दवडता रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक निरीक्षक नरसिंग यादव आणि हेडकॉन्स्टेबल ब्रम्हविर ब्राम्हणे याना रवाना केले. सुरक्षा बलाचे दोन्ही कर्मचारी धावत घटनास्थळी गेले. त्याचवेळी सुरत भुसावळ पॅसेंजरदेखील दुसऱ्या रुळावरून गेली. एक इसम रुळावर मान टाकून झोपलेला होता. यादव व ब्राम्हणे यांनी त्याला रुळाच्या बाजूला उतरवून विचारपूस केली असता त्याचे नाव किशोर पाटील असल्याचे सांगितले.
त्याने रुळाच्या बाजूला त्याची रिक्षा (एमएच१९एई ४२०६) लावलेली होती. मित्राशी फोनवर बोलत बोलत मी रेल्वे रुळावर केव्हा झोपून गेलो मला कळलेच नाही. मी आरोळ्या मारल्या तरी कोणी आले नाही, असे किशोरने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या पैलाड येथील नातेवाईकांना बोलावून किशोरला त्यांच्या ताब्यात दिले. सुदैवाने त्या रुळावरून कोणतीही रेल्वे आली नाही. मात्र लोको पायलट, गार्ड आणि स्टेशन मास्तरसह सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे किशोरचे प्राण वाचले म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.