रिक्त पदे असल्याने कृषी सहाय्यकांचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:13 AM2021-05-30T04:13:49+5:302021-05-30T04:13:49+5:30
कुरंगी, ता. पाचोरा : पाचोरा कृषी विभागात कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजनांची तसेच फळबाग व पोखरासारख्या ...
कुरंगी, ता. पाचोरा : पाचोरा कृषी विभागात कृषी सहाय्यकांची पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजनांची तसेच फळबाग व पोखरासारख्या अतिमहत्त्वाच्या योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.
कृषी पर्यवेक्षक पाचोरा १ अधिस्तव ६ कॄषी सहाय्यक असतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत एकही कृषी सहाय्यक नसल्याने शासनाच्या विविध योजना या शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, बी बियाण्याबाबत जनजागृती, पोखरा योजनेतील कामांसाठी माहिती न मिळणे यासह विविध कृषी योजना असल्याने कृषी सहाय्यकांचा कारभार रामभरोसे दिसून येत आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातील ९ गावांची निवड पोखरामध्ये करण्यात आली आहे. पोखरासारख्या अतिमहत्त्वाच्या योजना या विशेष कालावधीच्या असल्याने कृषी सहाय्यक गावपातळीवर असणे आवश्यक आहे. कृषी पर्यवेक्षक सजा पाचोरा १ अंतर्गत पाचोरा, खेडगाव नंदीचे, नांद्रा, माहिजी, बाबरूड प्र. बो. सामनेर, ही कृषी सहाय्यक सजाची पदे रिक्त आहेत.
पोखरा योजनेतील तिसऱ्या टप्प्यातील ९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. वेरूळी बु., खेडगाव नंदीचे, नाईक नगर, मोहाडी, हडसन, दुसखेडे, लाख, वडगाव खु. प्र.पा, पहाण, या गावांचा समावेश होऊन सहा महिने झाले तरी अजूनही कायमस्वरूपी कॄषी सहाय्यक नसल्याने कामे प्रलंबित आहेत.
मी २०१९-२०मध्ये माझ्या मालकीच्या तीन बिघे शेतात रोजगार हमी योजनेअंतर्गत लिंबू लागवड केलेली आहे. त्या लिंबू रोपांसाठी हात उसनवारीचे पैसे घेऊन रोपे मिळविली. मात्र एक वर्ष होऊनही मला रोपे अनुदानाची रक्कम मिळाली नाही.
-माधवराव नामदेव पाटील, कुरंगी.
पाचोरा कृषी विभागात ३६ कृषी सहाय्यकांची पदे आहेत. त्यात १४ पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. त्यामुळे त्यांचे कामे होत नसल्याने त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
-ए. व्ही. जाधव, प्रभारी कृषी अधिकारी, पाचोरा