लोकमत न्यूज़ नेटवर्क
जळगाव : महानगरपालिकेतर्फे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहिमअंतर्गत कोविड संशयित रुग्णशोध मोहीम राबविली जात आहे. या सर्वेक्षणाचे कोणतेही अतिरिक्त मानधन मिळणार नाही, अशी माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
सर्वेक्षणाप्रसंगी शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या मांडण्यासाठी नुकतीच जळगाव तालुका खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष सुनील पवार यांनी त्यांची भेट घेतली व शिक्षकांच्या अडचणीत मांडली. त्यात आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विमा संरक्षण मिळणार
शहरात प्रत्येक टीमला सातशे, आठशे घरांचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणाचे योग्यरीतीने नियोजन व्हावे, दिलेला भाग, घरे यांचे नीट नियोजन करून शिक्षकांना व्यवस्थित सूचना द्याव्यात असे आयुक्तांनी संघटनेचे पदाधिकारी यांच्या समोर मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना फोनवरून सूचना केल्या. सर्वेक्षणाचे कर्तव्य करत असताना दुर्दैवाने काही अनुचित प्रसंग शिक्षकांवर ओढवल्यास त्यांना योग्य ती विमा सुरक्षा मिळेल, अशीही माहिती आयुक्तांनी महासंघाला दिली.
साठा उपलब्ध होताच लसीकरण
सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी महासंघाचे उपाध्यक्ष पवार यांनी आयुक्तांकडे केल्यानंतर त्यांनी साठा उपलब्ध होताच प्राधान्याने शिक्षकांना लसीकरण करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सर्वेक्षण करता०नाचे फोटो मस्टर स्वाक्षरी आदीचे रेकॉर्ड असू द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.