भुसावळच्या ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सेवा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:37 PM2020-11-22T14:37:22+5:302020-11-22T14:38:06+5:30
सीएस यांच्या आदेशाला केराची टोपली
भुसावळ : शहरातील ट्रामा सेंटरला नॉन कोविड रुग्ण सेवेच्या सुविधा मिळाव्या यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीचे संयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. नागोजी चव्हाण यांनी ११ नोव्हेंबर रोजी ट्रामा सेंटरला नॉन कोविड सेवा देण्याचे आदेश दिले होते. मात्र तब्बल १० दिवस उलटूनही आदेशाचे पालन न झाल्याने स्थानिक प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या कोरोना संक्रमित रुग्ण आहेत तर ट्रामा सेंटरच्या इमारतीमध्ये केवळ आरटीपीसीआर चाचणी घेतल्या जातात. केवळ या चाचणीसाठी ट्रामा सेंटरची इमारत अडकवून ठेवण्यात आली होती. याबाबत डॉ. नी. तू. पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी ११ नोव्हेंबर रोजी आदेश देत ट्रामा सेंटर हे नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. देवर्षी घोषाल यांनी याबाबत आदेश पाळले नाहीत. ११ दिवस उलटूनही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झालेली नाही. अद्यापही या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जात आहेत. या कामासाठी संपूर्ण इमारत अडकवून ठेवली जात आहे. याबाबत शनिवारी डॉ. नी. तू. पाटील यांनी पाहणी केली. यासंदर्भात त्यांनी डॉ. चव्हाण यांच्याशी संपर्क साधून आदेशाची अंमलबजावणी का होत नाही? याबाबत तत्काळ कार्यवाही करुन रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पोलिसांनी मिळेल दिलासा
सध्या शहरातील पोलिसांना आरोपी, करागृहातील कैदी यांना वैद्यकिय तपासणीसाठी जळगाव येथील शिरसोली रोड वरील रुग्णालयात घेवून जावे लागते. यामुळे पोलिस यंत्रणेचा वेळ वाया जातो. ट्रामा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय तसेच आरोपींची तपासणी सुरु झाल्यास पोलिसांना दिलासा मिळेल.