चोसाका येथे चोरी करणाऱ्या चोरट्यांना काही तासातच अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 11:25 PM2021-06-30T23:25:27+5:302021-06-30T23:26:18+5:30
चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथे असणाऱ्या चोपडा शेतकरी साखर कारखाना साईटवर दि .२८ च्या मध्यरात्री चोरट्यांनी तांबा व पितळीच्या २० हजार चोरीमध्ये रुपये किंमतीच्या ३० पट्ट्या लंपास केल्या. या चोरट्यांना अवघ्या काही तासात गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले.
दि. २८ रोजी सकाळी चहार्डी साखर कारखाना साईटवर असणाऱ्या तांबा व पितळ च्या ३० इलेक्ट्रीक पट्ट्या गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द भारतीय दंड विधान कलम ३७९, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासाची चक्रे फिरविण्यात आली. काही तासातच संशयित आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरीमध्ये सहभागी असणाऱ्या अन्य आरोपींची नावेही त्याने सांगितली. त्याप्रमाणे सर्व सशंयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रविंद्र उत्तम भिल (गोरगावले), राजू पावरा (रामपुरा), भुरमल रोजी पावरा (अमरधामजवळ) , भुऱ्या पावरा (धान्य मार्केटजवळ) व रोहीत पावरा (चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मात्र, अद्यापपावेतो चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले नाही. ही कारवाई चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी पोलीस नाईक मधुकर नामदेव पवार व पो. कॉ. योगेश शिंदे यांनी केली.