पाचोरा : शिंदाड येथील ' शिंदाड युवा मंच' या व्हॉटस्ॲप ग्रुपने एक अनोखा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या ग्रुपने श्रद्धांजलीचे मॅसेज पाठविणारऱ्यांना कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी आवाहनक केल्यानंतर अनेक जणांनी मदत दिली. यातून लाखाचे निधी संकलन होत आहे.
उदात्त हेतूने निधी संकलनकोरोना महामारीत कुटुंबातील कर्ता पुरुष अचानक मृत्युमुखी पडल्यानंतर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कुटुंब उघड्यावर पडले. जवळचा मित्र नातेवाईक गावातील व्यक्ती अचानक मरण पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करून दुरूनच संवेदना व्यक्त केल्या जात आहे. मात्र कुटुंबाला काही आधार दिला जात नाही. व्हॉटस्ॲप ग्रुपवर सोशल मीडियामार्फत श्रध्दांजली अर्पण करून आपले कर्तव्य संपले, असे होत असतानाच शिंदाड येथील सुज्ञ नागरिकांनी 'आपणही समाजाचे काही देने लागतो 'ह्या उदात्त हेतूने निधी संकलन करून मृत पावलेल्या व्यक्तीच्या पश्चात मदत देण्याची संकल्पना राबवली जात आहे.
ऐपतीप्रमाणे दिला निधीशिंदाड येथील 'शिंदाड युवा मंच' या व्हॉटस्ॲप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन रमेश पाटील यांनी ग्रुपवर सहज 'भावपूर्ण श्रद्धांजली' मेसेज टाकणाऱ्यांना ग्रुपवर मेसेज टाकून संकल्पना मांडली की, मृत व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली असे मेसेज टाकून मोकळे होण्यापेक्षा आपण त्या परिवाराला आर्थिक मदत केली पाहिजे. तेव्हा ग्रुपमधील सुज्ञ नागरिकांनी आपल्या ऐपतीप्रमाणे १०० रुपयांपासून पुढे रोख रकमेच्या स्वरूपात मदतनिधी गोळा करण्याची संकल्पना व्यक्त केली. या मेसेंजला ग्रुपमधील सर्वानीच उत्तम प्रतिसाद दिला.
अनेक जण येऊ लागले पुढे'शिंदाड युवा मंच' ह्या ग्रुपच्या सदस्यांनी पाच दिवसात कोरोनाच्या काळात मृत व्यक्तीविषयी भावना व्यक्त करून यथाशक्ती १०० पासून ते पाच हजारांपर्यंतचा निधी ऑनलाईन गोळा केला. पाहता पाहता एक लाखापेक्षाही जास्त निधी गोळा झाला. या निधीचा विनियोग मृत व्यक्तीच्या परिवाराला किराणा साहित्य, तसेच आर्थिक मदत, काही गरीब परिवारातील व्यक्तीला कोरोनाचे उपचारासाठी मदत म्हणून देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गावातील व परिसरातील नागरिकही आता मदतीसाठी पुढे येत असून व्हॉट्सअप ग्रुपच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यामुळे ज्या कुटुंबावर संकट कोसळले त्याचा आधार म्हूणून शिंदाड युवा मंच हा ग्रुप आधारस्तंभ म्हणून उभा आहे.