न्यायालयातून तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला धमकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:05+5:302021-04-09T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : न्यायालयात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह १५ ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : न्यायालयात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह १५ ते २० जणांच्या टोळक्याने एका १३ वर्षीय पीडित मुलीसह तिच्या आईस जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी ३ वाजता बसस्थानक परिसरात घडला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पारस ललवाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुरुवारी भुसावळ न्यायालयात पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर पीडित मुलगी व तिची आई जळगावात नवीन बसस्थानकावर आले होते. रिक्षाची वाट पाहत असताना तेथे पारस ललवाणी व १५ ते २० जणांचा जमाव आला. न्यायालयात दिलेला जबाब मागे घ्या नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी ललवाणी याने पीडित मुलगी व तिच्या आईला दिली. या घटनेनंतर महिलेने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार ललवाणी याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.