जळगावात तीन माजी महापौर, २ नगरसेवक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:43 PM2018-07-13T14:43:48+5:302018-07-13T14:45:15+5:30
प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आपले नशिब अजमावत आहेत.
जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आपले नशिब अजमावत आहेत. याखेरीज राष्टÑवादी, काँग्रेसचे उमेदवारही रिंगणात आहेत.
अपक्षांबाबत मात्र गुरूवारी रात्रीपर्यंत प्रशासनाकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
माजी महापौर व खाविआचे सभागृहनेते नितीन लढ्ढा, माजी महापौर राखी सोनवणे यांचा प्रभाग क्र.८, श्यामकांत सोनवणे व वर्षा खडके यांच्या प्रभाग क्र.९ चा काही भाग, नरेंद्र भास्करराव पाटील व ज्योती तायडे यांचा प्रभाग क्र.२० पूर्ण व भाजपा गटनेते सुनील माळी, कंचन सनकत यांच्या प्रभाग ७ चा काही भाग मिळून हा नवीन प्रभाग क्र.५ तयार झाला आहे.
शनिपेठ, बळीरामपेठे, भवानीपेठ, पोलनपेठ, नवीपेठ, जयकिसन वाडी, सिव्हील हॉस्पिटल, दीक्षितवाडी, वानखेडे सोसायटी, ओंकारनगर, गांधीनगर, खान्देश मिल सोसायटी, शाहूनगर, इंदिरानगर अशी व्याप्ती असलेल्या प्रभाग क्र.५ मध्ये एकूण लोकसंख्या २३ हजार ३१५ आहे.
भंगाळे-माळी लढत
‘५-अ’च्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर विष्णू भंगाळे, भाजपाचे नगरसेवक सुनील माळी व काँग्रेसच्या जयश्री कदम रिंगणात आहेत. विष्णू भंगाळे यांची नगरसेवकपदाची ही तिसरी टर्म असून आता चौथ्यांदा नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवित आहेत. सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. तर एप्रिल २०१२ मध्ये महापौरपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या विरोधात भाजपाचे मनपातील गटनेते व विद्यमान नगरसेवक सुनील माळी हे रिंगणात आहेत. त्यांचीही ही दुसरी टर्म असून तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. तर काँग्रेसच्या जयश्री कदम व राष्टÑवादीचे हेमेंद्र महाजन पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे विष्णु भंगाळे व सुनील माळी अशीच लढत रंगण्याची शक्यता आहे.
ज्योती तायडे-आकांक्षा शर्मा लढत
५- क साठी शिवसेनेच्या ज्योती शरद तायडे रिंगणात आहेत. त्यांची नगरसेवकपदाची ही तिसरी टर्म असून आता चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजपाच्या आकांक्षा देवेश शर्मा, राष्टÑवादीच्या सादिका शेख पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. आकांक्षा ह्या मनपाच्या सेवानिवृत्त मुख्य वैद्यकीय अधिकारी स्व.निर्मला शर्मा यांच्या स्रुषा आहेत.