तीन सरकारी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 07:15 PM2020-12-27T19:15:09+5:302020-12-27T19:19:11+5:30
अमळनेरात एक वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण भागातील उपकेंद्रांवर काम करणारे दोन सीएचओ डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : विदेशात कोरोनाच्या विषाणूत बदल होऊन त्याने झपाट्याने संसर्ग करण्याचे रौद्ररूप धारण केल्यानंतररही अमळनेर शहरात नागरिक बेफिकीरीने वागत असून मतभेदांमुळे ‘जनता कर्फ्यू’ला फाटा दिला आहे. एक वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण भागातील उपकेंद्रांवर काम करणारे दोन सीएचओ डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत.
हळूहळू कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने व्यापाऱ्यांच्या संगनमताने प्रांताधिकारी सीमा अहिरे आणि मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी दर रविवारी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला होता. मात्र व्यापारी संघटनांमध्ये रविवार, बुधवार असे वेगवेगळे मतप्रवाह होते तर काहींनी बाजारातील परिस्थिती पाहून स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे दोन रविवारी अंशतः पाळलेला जनता कर्फ्यू तिसऱ्या रविवारी मात्र ‘जनता गर्दी’मध्ये दिसून आला. दर शुक्रवार किंवा शनिवारी पालिकेतर्फे रविवारबाबत आवाहन केले जात होते. मात्र यावेळी कोणतेही आवाहन न झाल्याने आणि लग्नाची तिथी असल्याने अमळनेरात जनता कर्फ्यू नव्हे तर जनता गर्दी दिसून आली.
भरपूर लग्नसमारंभ असल्याने येणाऱ्या पाहुण्यानी ‘सोशल डिस्टनसिंग’चा फज्जा उडवत वाहनांमध्ये कोंबून कोंबून प्रवास केला. बाजारात आता मास्क नावालाही दिसत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालये, रविवार सुटीचा वार असतानाही सर्व प्रकारची दुकाने व व्यवहार सुरू होते. रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दीही भरपूर होती. लग्नांमध्ये बँडवर नाचणारे बेधुंदपणे नाचत होती तर हळद, टाळी, समारंभ पूर्वीप्रमाणेच जल्लोषात सुरू होते. त्यावर कोरोनाचा असर कोठेही दिसून आला नाही.
अमळनेर तालुक्यात दररोज एक ते चार रुग्ण पॉझिटिव्ह येत असून ग्रामीण उपकेंद्रात काम करणाऱ्या सीएचओ डॉक्टरांनाही कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कोरोनाची भीती दूर झालेली नाही. काही रुग्णांनी खाजगी दवाखान्यात उपचार सुरू केले आहेत. कमी प्रमाण असले तरी काहींना श्वसनाचा त्रास झाल्याचे दिसून आले.