लग्नासाठी आलेल्या 3 जणांचा बस-दुचाकी अपघातात जागीच मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 07:07 PM2023-03-13T19:07:13+5:302023-03-13T19:07:44+5:30
जळगावातील वरणगाव येथे भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले.
बालू चव्हाण
वरणगाव (जळगाव) : भरधाव एसटी बस व मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुसरी- पिंपळगाव खुर्द ता. भुसावळ दरम्यान घडली. हे तीनही जण लग्नासाठी मनूरहून पिंपळगावला आले होते.
सचिन राजेंद्र शेळके (२६), भागवत प्रल्हाद शेळके (४३) आणि जितेंद्र कैलास चावरे (३२, तिघे रा. मनूर बुद्रूक ता. बोदवड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मनुर बुद्रुक येथील शेळके परिवारातील तरुणाचे पिंपळगाव येथे सोमवारी दुपारी विवाह होता. मनूर येथील नवरदेवाकडील तीन जण काही कामासाठी वरणगावकडे मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी भुसावळहून बोदवडकडे जाणाऱ्या बसने या मोटारसायकलला समोरुन जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की यात मोटारसायकलचा चुराडा झाला आणि तीनही जण जागीच ठार झाले.
नवरदेवाकडील तीन जण ठार झाल्याचे कळताच वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी उसळली होती. यातील सचिन शेळके याच्या पश्चात आई वडील, पत्नी तीन वर्षाचा मुलगा आहे. भागवत शेळके यांना मुलगा व मुलगी आहे तर जितेंद्र चावरे याच्यावर वृद्ध आई वडीलांची जबाबदारी होती. घरातील तीन कर्ते अपघातात गेल्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विजय जगन्नाथ शेळके (४५, रा . मनुर) यांच्या फिर्यादीवरुन बसचालक दिलीप तायडे यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास एपीआय आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी करीत आहेत. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच लग्न घरी आनंदाऐवजी शोक पसरला.