कन्नड घाटात तीन ट्रक एकमेकांवर आदळले, सहा तासापासून वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:40 PM2022-09-09T12:40:36+5:302022-09-09T12:40:52+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११वर असणा-या कन्नड घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता तीन ट्रक एकमेकांवर आदळले.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव जि. जळगाव :
राष्ट्रीय महामार्ग क्र. २११वर असणा-या कन्नड घाटात शुक्रवारी पहाटे चार वाजता तीन ट्रक एकमेकांवर आदळले. त्यामुळे गेल्या सात तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत महामार्ग पोलिसांना काहीअंशी वाहतूक सुरळीत करण्यात यश आले होते. दरम्यान या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही.
शुक्रवारी पहाटे घाटातील महादेव मंदिराजवळ तीन ट्रक एकमेकांवर आदळल्या. यामुळे घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अपघाताचे वृत्त समजातच राष्ट्रीय महामार्ग चाळीसगाव केंद्राचे अधिकारी भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील, पोहेकाॕ चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक नरेश सोनवणे, सोपान पाटील, शैलेश महाजन, नितिन ठाकुर, दिनेश चव्हाण, रमेश पाटील, जितेंद्र माळी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने हटविण्याचे काम सुरु केले. सकाळी ११ वाजता क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त तिनही ट्रक हटविल्यानंतर चाळीसगाव व औरंगाबाद या दोन्ही बाजुंनी थांबून असलेली वाहने सोडण्यात आली. दुपारी एक वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे.