सदोष मनुष्यवधप्रकरणी तिघांना साडेसात वर्ष सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:47+5:302021-08-15T04:19:47+5:30

जळगाव : तालुक्यातील जळके येथील राजू देवराम सुरवाडे (२२, रा.जळके) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्यात दोषी असल्याचे सिध्द झाल्यानंतर ...

Three were sentenced to seven and a half years rigorous imprisonment for culpable homicide | सदोष मनुष्यवधप्रकरणी तिघांना साडेसात वर्ष सश्रम कारावास

सदोष मनुष्यवधप्रकरणी तिघांना साडेसात वर्ष सश्रम कारावास

Next

जळगाव : तालुक्यातील जळके येथील राजू देवराम सुरवाडे (२२, रा.जळके) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणाच्या खटल्यात दोषी असल्याचे सिध्द झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. ठुबे यांनी शनिवारी आबा अर्जुन सोनवणे (१९), सुपडू रामकोर सोनवणे (२०), देवा धनराज भिल (२३, सर्व रा. जळके) या आरोपींना साडेसात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

आमच्या वाड्यातील मुलीकडे पाहिले तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आबा सोनवणे, सुपडू सोनवणे, देवा भिल या तिघांनी राजू देवराम सुरवाडे या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून वडील देवराम यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिघांनी त्यांना उचलून बाजूला फेकून दिले. ही घटना ९ जुलै २०१८ रोजी जळके येथे घडली होती. मात्र, जखमी राजू याचा रुग्णालयात उपचार घेत असताना ११ जुलै रोजी मृत्यू झाल्यानंतर वडिलांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१७ साक्षीदार तपासले

या गुन्ह्याचा तपास होऊन खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ जी़ ठुबे यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मयताचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे जितेंद्र राठोड, वैद्यकीय अधिकारी, मयताचे वडील, आई, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, गावातील प्रत्यक्षदर्शी व तपासी यंत्रणेतील अधिकारी यांच्या सर्वांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या़ त्यानंतर तिघांविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यांना मयताच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून दोषी ठरविण्यात आले.

अशी सुनावली शिक्षा

राजू सुरवाडे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आबा सोनवणे, सुपडू सोनवणे, देवा भिल या तिघांना भादंवि कलम ३०४ (पार्ट-२) सह ३४ खाली प्रत्येकी ७ वर्ष ६ महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ३० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास दीड वर्ष साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ५०६ सह-३४ प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. कलम ३२३ सह ३४ प्रमाणे ६ महिने साधा कारावास व प्रत्येकी ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.

कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

एकूण दंडाची रक्कम ९० हजार रुपये ही आरोपींकडून वसूल करण्यात आल्यानंतर त्यातील ७५ हजार रुपयांची रक्कम ही मयताच्या आई-वडिलांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.पंढरीनाथ चौधरी यांनी तर आरोपीतर्फे अ‍ॅड.प्रवीण पांडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून तुषार मिस्तरी यांनी मदत केली.

Web Title: Three were sentenced to seven and a half years rigorous imprisonment for culpable homicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.